Uncategorized

रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे योग्य नियोजन करावे-प्रांताधिकारी सचिन ढोले

तालुक्यात पतपुरवठ्याचे 275 कोटींचे उद्दीष्ट

 जन संवाद वेब न्यूज पोर्टल 

(आबासाहेब दुधाळे)

पंढरपूर, दि. 24:-  अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडल्याने त्यांना शेती उत्पादनासाठी पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. यासाठी बॅकांनी कर्ज वाटपाबाबत योग्य नियोजन करावे अशा सूचना, प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.

तालुक्यातील रब्बी हंगामात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पत पुरवठ्याचे  उद्दिष्ट गाठण्यासाठी  बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सहाय्यक  निंबधक एस.एम.तांदळे व तालुक्यातील बँकेचे शाखाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे  पीकांचे व फळबागांचे नुकसान झाल्याने  शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. पीक कर्ज वाटपाबाबत बँक अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी तसेच शेतकऱ्यांना सहकार्य करून बँकांनी सुलभपणे व तातडीने पीक कर्ज वाटप करावे. कर्ज मागणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्याची बँकांची जबाबदारी आहे याबाबत दक्षता घ्यावी अशा सूचना  प्रांताधिकारी  ढोले यांनी यावेळी  दिल्या

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकरी यांना रब्बी पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. यामध्ये अल्प- अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्ज उपलब्ध करून द्यावीत. शेतकऱ्यांना कर्ज वाटपाबाबत कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता बँकांनी घ्यावी अशा सूचना प्रांताधिकारी ढोले यांनी दिल्या.

तालुक्यातील रब्बी पीक वाटपाचे 275 कोटींचे उद्दीष्ट सर्व बँकांनी पुर्ण करावे.महात्मा ज्योतिराव फुले कृषी सन्मान योजनेतील सर्व पात्र शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे. अशा सूचनाही सहाय्यक निबंधक  तांदळे यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *