Uncategorized

कोरोनाचा पुन्हा वाढता प्रादुर्भाव आरोग्य सुरक्षिततेच्या कारणास्तव तारीख पुढे ढकलली :- अभिजीत पाटील

जन संवाद वेब न्यूज पोर्टल

(आबासाहेब दुधाळे)

पंढरपूर/ शिवजयंती निमित्त पंढरपूर येथे प्रथमच आयोजित शिवपुत्र संभाजी महाराज या ऐतिहासिक महानाट्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाली होती. सर्व तयारी पूर्ण झाली होती. मंडप सजले होते, प्रवेशिका तयार झाल्या होत्या परंतु मागील आठवड्यापासून वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जबाबदारीचे एक पाऊल पुढे टाकत हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे, असे श्री. अभिजीत पाटील यांनी सांगितले.

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे, तसेच परदेशातील वेगळे स्ट्रेन भारतात प्रसारित होत आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आली तरीही संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकाच वेळी असंख्य नागरिकांची सोय असलेल्या आणि ५ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमास असंख्य लोकांच्या उपस्थितीची शक्यता होती. ही शक्यता लक्षात घेऊन श्री. अभिजीत पाटील यांनी एक सकारात्मक उदाहरण प्रस्तुत केल्याची चर्चा परिसरात घडत आहे. मैदान, मंडप तसेच नाट्य कलाकार यावर झालेल्या खर्चाचा विचार न करता नागरिकांचे आरोग्य हीच प्राथमिकता ठेऊन त्यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलला याविषयी समाजातील ज्येष्ठांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेला कायम प्रथम स्थान दिले. त्यांनी घालून दिलेला आदर्श त्यांच्याच जयंतीला आपण डावलू शकत नाही. आपल्या राजाचा जयंती महोत्सव मनासारखा साजरा करण्यासाठी आपण काहीशी वेगळी वाट धरणे या वर्षी आवश्यक आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालून जयंती साजरी करणे हे साक्षात् छत्रपतींना देखील आवडणार नाही. काळ कठीण आहे. या वर्षी विठ्ठलाची वारी देखील होऊ शकली नाही आणि आता आपल्या राजाची जयंती साजरी करताना देखील मर्यादा आहेत. पण तरी त्यांनी दिलेली ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आपण एकजुटीने या संकटाचा सामना करू, आणि त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन जगू, काही दिवसांनी पुन्हा महा नाट्याचे आयोजन करू, त्यात सर्वांनी सहभागी व्हावे.” असे आवाहन श्री. अभिजीत पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *