Uncategorized

शेतकऱ्यांसाठी आक्रोश व्यक्त करण्याची निवडणूक -आ. प्रशांत परिचारक

जन संवाद वेब न्युज पोर्टल 

(आबासाहेब दुधाळे)

पंढरपूर (प्रतिनिधी) सध्या सुरू असलेल्या पोटनिवडणुकीतुन, सरकार विरोधात आक्रोश व्यक्त करण्याची संधी शेतकरी बांधवांना मिळाली आहे. पाणी, वीज आणि शेतमालाचे भाव यामुळे शेतकरी खूपच अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांची जराही फिकीर नसणाऱ्या या राज्यसरकार विरोधात आक्रोश व्यक्त करण्याची ही निवडणूक आहे, असे मत आ. प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, उमेदवार समाधान अवताडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी रांजणी येथील शंभू महादेवाचा आशीर्वाद घेऊन सुरू करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार प्रशांत परिचारक यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. थकित वीज बिलापोटी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे कनेक्शन खंडित करण्याचा झपाटा महावितरण कंपनीने लावला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनीच तसे आदेश दिले आहेत. राज्यातील सुमारे ७५ लाख शेतकऱ्यांची वीज कनेक्शन खंडित करण्यात आली आहेत. कोरोनासंदर्भात व्यवस्थित उपाय योजना न राबवता, पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सर्वकाही सुरळीत सुरू असताना लॉकडाऊन शब्द उच्चारताच , द्राक्ष पिकाचे भाव गडगडले. व्यापाऱ्यांना आयतीच संधी मिळाली आणि बेदाण्याचे भाव पडले. दुहेरी अडचणीत सापडलेला शेतकरी संतापला गेला. शेतकऱ्यांचा हा आक्रोश व्यक्त करण्याची संधी या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शेतकऱ्यांना चालून आली आहे. चुकीचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा मुलाहिजा न बाळगणाऱ्या या सरकारला जागा दाखवण्याची हीच वेळ असल्याचे मत, आ. परिचारक यांनी यावेळी व्यक्त केले.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी महायुतीच्या उमेदवारास मत देण्याचे मतदारांना आवाहन केले. आ. प्रशांत परिचारक आणि स्वतःच्या कर्तुत्वावर पुढे आलेले उमेदवार समाधान अवताडे या विकासाच्या जोडीला मतदारांनी साथ द्यावी असे मत व्यक्त केले. आमदारकीची संधी सोडून अवताडे यांच्या पाठीशी हत्तीचं बळ लावलेल्या आ.प्रशांत परिचारक यांच्या पाठीशी दारांनी उभे राहावे असे आवाहन परिचारक समर्थकांना केले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा प्रभारी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी उपस्थित मतदारांपुढे महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा आणि अनैतिकतेचा पाढा वाचला.

याप्रसंगी पंढरपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख, भाजपनेते बी.पी. रोंगे, प्रणव परिचारक, पांडुरंग कारखान्याचे संचालक दिनकर मोरे , भास्कर कसगावडे , हरीश गायकवाड, अरुण घोलप, सुरेश आगावणे , सुनील सर्वगोड, हरिभाऊ गावंधरे, बाळासाहेब देशमुख यांचेसह महायुतीतील मित्र पक्षांचे बहुसंख्य नेते उपस्थित होते.

 

नागरिकांना कोणतीही सुरक्षा न देता लॉकडाऊन पुकारल्याने, शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भरमसाठ वीज बिले आकारली जात आहेत. शेतमालाचे भावही गडगडले आहेत. राज्यात शेतकरी वर्ग भरडला जात आहे. यातच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून राज्य सरकारवर संताप व्यक्त करण्याची संधी शेतकऱ्यांना चालून आली आहे .या संधीचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन आ. प्रशांत परिचारक यांनी महायुतीचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारा दरम्यान केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *