नैसर्गिक आपत्ती आधार प्रमाणीकरण सर्व्हर बिघाड: शेतकरी हैराण, केंद्र चालक परेशान .
सोलापूर | महाराष्ट्र शासन नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत मंजूर केली आहे. सदरील निधी मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. मागील १४-१५ दिवसांपासून आधार प्रमाणिकरणाची वेबसाईटच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने आधार प्रमाणीकरण होत नाही. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकरी दिवस- रात्र महा ई सेवा केंद्रांचे उंबरठे झिजवत फिरत आहेत. आधार प्रमाणीकरण सर्व्हर तात्काळ सुरळीत सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी ग्रासुन गेला आहे, पाण्याचे जलस्त्रोत आटत चाललेले आहेत. पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांना चारा नाही. जनावरे कशी जगवायची हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे जनावरांना चारा आणि काही ठिकाणी पाणी विकत घेऊन पाजण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत मंजूर केल्याने जनावरांसाठी काही दिवसांच्या चारा पाण्याची व्यवस्था करता येणे शक्य झाले आहे. मात्र सर्व्हर डाऊनमुळे शासनाने देऊ केलेली मदत शेतकरी घेऊ शकत नाहीत. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी महा ई सेवा केंद्रामध्ये सकाळपासून रात्री १२-१२ वाजेपर्यंत थांबून प्रमाणीकरण होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
केंद्र चालक सुद्धा सकाळी ७ वाजलेपासून केंद्र सुरू करतात आणि रात्री १२ वाजले तरी केंद्र सुरू असल्याचे दिसून येते. रात्रंदिवस आधार प्रमाणिकरण साठी शेतकऱ्यांची गर्दी असल्याने इतर कामं करता येत नसल्याने केंद्र चालकांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत आहे.
दुष्काळ निधीच्या रकमेनुसार उधारीवर चारा आणि इतर बाबी घेतल्या असून उधारी देण्याची तारीख संपून गेली तरी आधार प्रमाणीकरण होत नसल्याने शेतकरी पुरता वैतागून गेला आहे. मेटाकुटीला आला आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शासनाने युद्ध पातळीवर सर्व्हर मधील तांत्रिक दोष दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
०००
बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क-
9527271389