दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान…. दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरासाठी दिव्यांगांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद; कोणत्या तालुक्यात केव्हा शिबीर असेल सविस्तर जाणून घ्या.
दिनांक 19 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2024 या कालावधीत प्रत्येक तालुक्यात दिव्यांग शिबिराचे आयोजन | एकूण 22 दिव्यांग प्रमाणपत्र वाटप शिबिराच्या माध्यमातून 15 हजार 666 लाभार्थ्यांची तपासणी करून प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन
सोलापूर, दिनांक 7(जिमाका):- जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत तपासणी व निधन विशेष मोहीम कार्यक्रम दिनांक 19 ऑगस्ट 2024 ते 23 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक तालुक्यात दोन दिवस याप्रमाणे 22 शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून या शिबिरातून 15 हजार 666 दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांगात्वाची तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे नियोजन आहे. तरी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व स्वयंसेवी संस्थांनी या शिबिराच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींची कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान शिबिरांची पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी मित्राचे संचालक अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. मोहन शेगर, प्राथमिक शिक्षण विभागाचे जिल्हा समन्वयक परमेश्वर कमाजी जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तोडकर अक्कलकोट पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी ए आर दोडमणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर एस. ए. टेंगले यांच्यासह आरोग्य विभाग व स्वयंसेवी संस्था चे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की या शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यातील एकही दिव्यांग लाभार्थी प्रमाणपत्रापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत. या शिबिरात सर्व यंत्रणांनी अत्यंत सकारात्मकता ठेवून काम करणे अपेक्षित आहे. सर्व डॉक्टर्सनी ही चाकोरी बाहेर जाऊन काम करावे. या शिबिरासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य व सर्व सोयी सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शिबिराच्या ठिकाणी दिव्यांग लाभार्थ्यांची ने – आण करणे व त्या ठिकाणी त्यांना अन्य सुविधा पुरवण्यासाठी कोणत्याही प्रकारची कुचराई होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.
जिल्ह्याच्या अकरा तालुक्यात प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण 22 शिबिराचे आयोजन करण्यात येत असून यासाठी 15 हजार 66 दिव्यांग लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. जिल्ह्यातील दिव्यांगांची संख्या एक लाख 15 हजार 755 इतकी असून यातील 68% ग्रामीण भागातील तर शहरी भागातील 32 टक्के दिव्यांग संख्या आहे. आशाताई आणि यंत्रणेतील तालुका स्तरावरील संबंधित घटकांसाठी 27 कार्यशाळा घेण्यात आले असून त्यातून 3742 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती मित्राचे संचालक अभिजीत राऊत यांनी दिली.
या अभियानात आरोग्य यंत्रणा, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, समाज कल्याणचे अधिकारी, स्वयंसेवी संस्था व मिशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड ॲक्शन(मित्रा) यंत्रणेवर जबाबदारी असून हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्परात समन्वय ठेवून सहकार्य करण्याची अपेक्षा श्री. राऊत यांनी व्यक्त केली.
शिबिर वेळापत्रक-
जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र देण्याकरीता दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी आणि निदान विशेष मोहिम कार्यक्रम शिबीर वेळापत्रक तालुका, लाभार्थी संख्या, शिबीर स्थळ, दिनांक, वार व वेळ निहाय पुढीलप्रमाणे –
पंढरपूर– 1342, ग्रामीण रुग्णालय, पंढरपूर, दिनांक 19 व 20 ऑगस्ट 2024, सोमवार व मंगळवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता.
अक्कलकोट – 1532, ग्रामीण रुग्णालय, अक्कलकोट, दिनांक 22 व 23 ऑगस्ट 2024, गुरुवार व शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता.
बार्शी – 1357, ग्रामीण रुग्णालय, बार्शी, दिनांक 26 व 27 ऑगस्ट 2024, सोमवार व मंगळवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता.
माळशिरस – 1720, ग्रामीण रुग्णालय, माळशिरस, दिनांक 29 व 30 ऑगस्ट 2024, गुरुवार व शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता.
सांगोला – 1803, ग्रामीण रुग्णालय, सांगोला, दिनांक 2 व 3 सप्टेंबर 2024, सोमवार व मंगळवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता.
करमाळा– 1629, ग्रामीण रुग्णालय, करमाळा, दिनांक 5 व 6 सप्टेंबर 2024, गुरुवार व शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता.
मोहोळ– 1841, ग्रामीण रुग्णालय, मोहोळ, दिनांक 9, 10 व 12 सप्टेंबर 2024, सोमवार, मंगळवार व गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता.
माढा– 1292, ग्रामीण रुग्णालय, कुर्डूवाडी, दिनांक 13 व 14 सप्टेंबर 2024, शुक्रवार व शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता.
मंगळवेढा– 808, ग्रामीण रुग्णालय, मंगळवेढा, दिनांक 17 व 19 सप्टेंबर 2024, मंगळवार व गुरुवार सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता.
सोलापूर दक्षिण – 1294, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सोलापूर, दिनांक 20 व 21 सप्टेंबर 2024, शुक्रवार व शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता.
सोलापूर उत्तर – 561, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सोलापूर, दिनांक 23 सप्टेंबर 2024, सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता.