गुन्हेगारीताज्या बातम्यासोलापूरसोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यात भोंदू बाबाचे प्रस्थ वाढतंय?

जनसंवाद : अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी शासनाने ‘महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम २०१३’ हा एक क्रांतिकारी कायदा निर्माण केला आहे. अ.भा.अंनिसचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांना अंधश्रद्धा संपवण्यासाठी करीत असलेल्या कार्यामुळे जीव गमवावा लागला. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर डिसेंबर २०१३ मध्ये हा कायदा अस्तित्वात आला.

 

महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम २०१३’ हा कायदा अंमलात आणणाऱ्या विधानसभेचे सदस्य, कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी, कर्मचारीच सध्या भोंदू बाबांच्या दरबारात दिसून येत आहेत. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी अशा बाबांच्या आश्रमाला भेट देत असल्याचे व्हिडिओ व्हायरल करून जास्तीत जास्त भोळ्या भाबड्या जनतेला आकर्षित करण्याची संधी सोडतील तर ते बाबा कसले?

 

अनुकरणप्रिय असलेल्या महाराष्ट्रात देवाच्या नावाखाली आर्थिक उलाढालीची दुकाने चालवली जातात अशा ठिकाणी जेव्हा एखादा राजकीय नेता, प्रशासनातील अधिकारी किंवा पोलीस खात्यातील अधिकारी भेट देतात, शेकडोंच्या संख्येने जमलेल्या लोकांसमोर भोंदू बाबांच्या पायावर लोटांगण घेतात तेव्हा या घटनेचा खूप मोठा विपरीत परिणाम सामाजिक पातळीवर होत असतो. भोंदूगिरी करून गरिबांच्या खिशावर डल्ला मारण्यासाठी भेट दिलेल्या अधिकाऱ्यांचे व्हिडिओ करून समाज माध्यमावर व्हायरल करून प्रसिद्धी मिळवण्यात हे बाबा आणि त्याचे चेले पटाईत असतात. जे पटाईत आहेत त्यांचाच वापर या कामासाठी केला जातोय.

 

महाराज माझे भले करतील या आशेपोटी अनेकजण वर्षानुवर्ष सेवा करतात पण त्यांचे कधीच भले होत नाही. सेवकांचे भले झाले तर नंतर नवीन विश्वासू सेवक कुठून आणायचे हे यामागील गणित असू शकते. परंतु आपण बाबांची सेवा करूनही आपल्या समस्या सुटत नाहीत हे जेव्हा लक्षात येते तेव्हा सेवक जाब विचारण्यास सुरू करतात. जाब विचारला की सेवकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून बाबा पवित्र राहतात आणि दुसरा विश्वासू सेवक मिळेपर्यंत दरबार बंद ठेवतात ही वस्तुस्थिती आहे.

 

उच्च तांत्रिक विद्या विभूषित असल्याचे भासवून जनमानसात पेरलेल्या हस्तकांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येकाची माहिती घेऊन भूतकाळातील माहिती सांगून एका क्षणात भुरळ पाडून वीस वीस हजार रुपये सहज काढून घेतले जातात. गोरगरीब भोळे भाबडे लोक आपले भले होईल या अशेपोटी सोने गहाण ठेऊन, व्याजाने पैसे घेऊन अशा भोंदू बाबांना देतात मात्र जेव्हा त्यांनी दिलेल्या तंत्र, मंत्रांचा काहीच उपयोग होत नाही तेव्हा आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात येते. मध्यस्थी सेवकाला अडचण सांगितली जाते, सेवक बाबांना सांगतो पण बाबा थातुर मातुर उत्तरे देऊन मोकळे होतात. बाबांचा वेळ काढूपणा जेव्हा लक्षात येतो तेव्हा हेच विश्वासू  सेवक जाब विचारतात किंवा बाबांना आणि फसलेल्या व्यक्तींना टाळण्यासाठी घरदार सोडून परागंदा होतात. त्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नसतोच.

 

सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा घटना नवीन नाहीत. मागील काही वर्षांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. नंतर बाबावर गुन्हे दाखल झाले वगैरे. परंतु त्या घटनेनंतर काही काळ जाताच परत भोंदूगिरीचे प्रमाण वाढत चालले आहे. जनसंवाद अशा कृत्यांवर बारकाईने लक्ष ठेऊन असून लवकरच भोंदूबाबांची अनेक प्रकरणे जनतेसमोर येतील. अनेक लोकप्रतीनिधी आणि अधिकारी भोंदू बाबांपासून दूर गेलेले असल्याचे दिसून येत आहेत. मात्र आपले नाव समोर येऊ नये म्हणून किंवा बाबंचेच नाव समोर येऊ नये म्हणून लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्यास लुटमार झालेल्या जनतेला न्याय मिळणे म्हणजे दुव्यस्वप्न ठरू शकते.

०००

भोंदूगिरी करून कुणाची फसवणूक झाली असेल तर ९५२७२७१३८९ या नंबरवर संपर्क केल्यास जनसंवाद कडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button