इंस्टा या सोशल ॲपवरून ओळख करून जबरदस्तीने लुटमार करणारी टोळी गजाआड
जनसंवाद/कुर्डूवाडी दि. ८: नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील तरुणाला सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील एका तरुणीने इंस्टाग्राम या समाज माध्यमावरून जाळ्यात ओढले. शेकडो किलोमीटर प्रवास करीत भेटण्यासाठी आला. पण तो हनी ट्रॅपमध्ये फसला आहे हे जेव्हा लक्षात आले तोपर्यंत त्या तरुणाने खूप काही गमावले होते. शेवटी त्यांना पोलिस स्टेशन गाठावे लागले. पोलिसांनीही काही तासातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. नक्की काय प्रकार घडला तो सविस्तर जाणून घेऊया.
मयूर बाबासाहेब गवंडी, वय ३० वर्षे, धंदा नोकरी, रा.जळगाव नेवुर ता. येवला जि. नाशिक यांची मागील ८ दिवसांपासून इंस्टाग्राम (Instagram) या माध्यम मध्यम ॲपवरून कोमल गजेंद्र काळे रा.कुर्डूवाडी (ता. माढा) हिचे बरोबर ओळख झाली होती. त्यानंतर तिने दि.७ मार्च २०२४ रोजी मयूर यास स्वत:चा मोबाईल नंबर दिला. त्यानंतर मयुरने कोमल हिस फोन केला होता. फोन केल्यानंतर तिने तुम्ही कुर्डूवाडी येथे भेटण्यासाठी या असे सांगितल्याने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादी मयूर गवंडी त्यांची मोटार सायकल क्र. एमएच १५ एएल ८८०७ वरून कुईवाडी येथे आले.
फिर्यादी मयूर गवंडी यांनी कुर्डूवाडी येथे आल्यानंतर कोमल हिस फोन केला असता तिने लऊळ येथे बोलाविले. फिर्यादी लऊळ येथे गेले असता कोमल हिने माझ्या घरातील लोक थोड्या वेळेने बाहेर कार्यक्रमासाठी जाणार आहेत, ते गेल्यानंतर मी येते तोपर्यंत तु एक तास तेथेच थांब असे सांगितले. त्यांनतर फिर्यादी रात्री ८ वाजेपर्यंत तिथेच थांबले. त्यानंतर कोमल येत नसल्याचे पाहून फिर्यादी बार्शी येथे मित्राकडे जात असताना कोमल हिने मी परंडा रोडला थांबली आहे. तु इकडे ये. येताना तेजश्री हॉटेल मधून ३ बिअर घेऊन ये असे फोन करून फिर्यादीस सांगितले.
फिर्यादी हॉटेलमधून बिअर घेऊन गेलेनंतर कोमल फिर्यादीचे मोटार सायकलवर बसली आणि पुढे लॉज आहे आपण तेथे जाऊ असे फिर्यादीस सांगितले. त्यानंतर फिर्यादीला पाण्याच्या टाकीमागील बाजूस असलेल्या मोकळ्या पटांगणात घेऊन गेली. तेथे गेल्यानंतर कोमलने मला लघु शंकेचा बहाणा करून थांबण्यास सांगितले. गाडी थांबव असे सांगितले त्यामुळे फिर्यादीने गाडी थांबवली. त्यावेळी पाठीमागुन दोन अनोळखी पुरूष आले. त्यातील एकाने ती माझी बायको आहे. तु तिला कुठे घेऊन चालला? तिच्यावर बलात्कार केला काय असे विचारले. त्यानंतर लगेच दोन्ही अनोळखी पुरुषांनी काठीने पायावर व दगडाने पाठीत फिर्यादीस मारून पोलीसात तुझ्या विरूध्द तक्रार देतो असे म्हणू लागले.
त्यावेळी त्यांनी फिर्यादीच्या खिश्यातील ५००० रू किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल व २० हजार रूपये रोख रक्कम असा एकुण २५ हजार रुपयेचा मुद्देमाल काढून घेतला. त्यावेळी कोमल नवऱ्याला अमोल असे म्हणून हाक मारत होती. लुटमार केल्यानंतर ते सर्वजण तेथून पळून गेले.
मयूर गवंडी यांनी तत्काळ कुर्डूवाडी पोलिस स्टेशन गाठले व घडलेली हकीकत सांगून कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अगदी काही कालावधीतच वेगाने तपासाची चक्रे फिरवत दाखल गुन्ह्यातील २ आरोपी कोमल गजेंद्र काळे, वय २४ वर्ष, रा.परंडा रोड, कुर्डूवाडी ता. माढा २. अमोल धनंजय खेंदाड, वय ३२ वर्ष, रा.खेंदाड गल्ली, वैराग (ता. माढा) यांना अटक केली. तसेच गुन्ह्यातील अन्य एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल व गुन्हा करताना वापरलेले हत्यार लाकडी काठी, दगड हे जप्त अरण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींवर गु.र.नं. १०१/२०२४, भादवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर जबरी चोरीच्या गुन्हयातील चोरीस गेलेल्या एकूण मुद्देमालापैकी एकूण ५,०००/- रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे.
श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, श्री. डॉ. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, श्री. अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली कुर्डूवाडी पोलिस ठाण्याचे पो.नि.सुरेश चिल्लावार, सपोनि शिवाजी जायपत्रे, पो.उ.नि.सारिका गटकुळ या अधिकाऱ्यांनी पोहेकॉ/ १६३४ संतोष मोरे, पोना / ३३९ केशव झोळ, पोका / १०६१ प्रशांत किरवे, पोका/२००९ दादासाहेब सरडे आदींच्या साहाय्याने आरोपीस जेरबंद केले.
सदर आरोपीतांना दि. ९ मार्च रोजी माढा कोर्ट येथे रिमांडकामी हजर करून पोलीस कोठडी रिमांड मंजूर करून गुन्हयाचा पुढील तपास करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पो.उ.नि.सारीका गटकुळ करीत आहेत.