पुरवठा विभागात झिरो कर्मचाऱ्यांच्या लुटमारीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.
माढा प्रतिनिधी : माढा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात झिरो कर्मचाऱ्यांची चलती आहे. विविध कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना अरेरावीची भाषा वापरली जात असून दुय्यम वागणूक मिळत आहे. शिधापत्रिका (Ration Card) ऑनलाईन करणे, नावे दुरुस्त करणे, शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, नाव वाढवणे अशा विविध कामासाठी शंभर रुपये ते पाचशे रुपयांची वसुली केली जात आहे. खुलेआम सुरू असलेल्या लुटमारीबाबत अधिकारी मात्र अनभिज्ञ(?) आहेत.
माढा तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग काही ना काही कारणाने नेहमी चर्चेत असतो, धान्य घोटाळा असो की रेशन दुकानदारांची अडवणूक असो. परंतु गेल्या काही वर्षापासून पुरवठा विभागातील सर्व कारभार खाजगी व्यक्तींकडून चालवला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. झिरो कर्मचारी नागरिकांशी हुज्जत घालताना सर्रास आढळून येतात.
आयुष्यमान भारत (PMJAY) ही आरोग्य योजना सध्या राज्यात राबविली जात आहे. एकही लाभार्थी व्यक्ती वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिकेनुसार नावे योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. परंतु काही नागरिकांची शिधापत्रिकेतील नावे अपूर्ण आहेत, तर काही नागरिकांच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे. आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी (KYC) केल्यानंतर शिधा पत्रिकेनुसार अपूर्ण, चुकीची नावे आयुष्यमान भारत कार्डवर येत आहेत. साधारण ६० ते ८० टक्के नागरिकांची नावे दुरुस्त करावी लागत आहेत.
नावातील स्पेलिंग चुकणे, अपूर्ण नावे असणे ही पुरवठा विभागाची चूक आहे. ज्या एजन्सीने डाटा एंट्रीचे काम केले आहे त्या एजन्सीकडून सर्व शिधापत्रिका दुरुस्त करून घेण्याची जबाबदारी कोणीही घेण्यास तयार नाही. डाटा एंट्रीमध्ये केलेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी नागरिक रोजंदारीचे गोरगरीब मजूर नागरिक शे-पाचशे रुपयांच्या मजुरीवर पाणी सोडून तहसीलचे उंबरठे झिजवत आहेत. शिधापत्रिका दुरुस्त करण्याची जबाबदारी पुरवठा विभागाची असताना नागरिकांना वेठीस धरून नागरिकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. याबाबत अनेक नागरिकांनी तोंडी आणि लेखी स्वरूपात वरिष्ठांकडे तक्रार करून काही उपयोग होत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.
नागरिकांना दिलासा देण्यासाठी अधिकारी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणार की उर्मट, लाचखोर कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणार याबाबत तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
क्रमशः
००००००
बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क 9527271389