ताज्या बातम्यामहाराष्ट्रमाढा-करमाळासोलापूर जिल्हा

अटल भूजल ग्राम समृध्द स्पर्धेत माढा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार भेंड, लोंढेवाडी आणि सोळंकरवाडी ग्रामपंचायतींना पुरस्कार प्राप्त

सोलापूर दि.10 (जिमाका):- राज्यस्तरीय अटल भूजल ग्राम समृध्द स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दि. 9 सप्टेंबर रोजी नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडला. अटल भूजल ग्राम समृध्द स्पर्धेत सन-2022-23  या वर्षासाठी जिल्हास्तरीय गटात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार भेंड ता . माढा, व्दितीय क्रमांक पुरस्कार लोंढेवाडी ता. माढा, आणि तृतीय क्रमांक पुरस्कार सोळंकरवाडी   ता. माढा  या ग्रामपंचायतींना प्रदान करण्यात आला.

पुरस्कार वितरण सोहळ्याचे  अध्यक्ष पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री  गुलाबराव पाटील  आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री  दादा भुसे  यांच्या हस्ते पार पाडले .  या सोहळ्यात जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार 50 लाख रूपये, व्दितीय पुरस्कार 30 लाख रूपये आणि तृतीय पुरस्कार  20 लाख रूपये रोख रक्कम ,प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह स्वरूपात देण्यात आले.

या सोहळ्यात  खासदार भास्कर भगरे  , पाणी पुरवठा स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव  संजय खंदारे ,  भूजल सर्वेक्षण आणि  विकास यंत्रणेचे  आयुक्त पवनीत कौर,  अतिरिक्त संचालक डॉ. विजय पाखमोडे  ,सहसंचालक डॉ. प्रविण कथने , नोडल अधिकारी श्रृषीराज गोस्की , वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख,  तसेच  जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष , जिल्हा अंमलबजावणी भागीदार  (मार्च) चे समन्वयक यांसह भेंड, लोंढेवाडी व सोळंकर वाडी येथील सरपंच , उपसरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.  या प्रसंगी अटल भूजल योजनेच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

अटल भूजल योजना सध्या राज्यातील  13 जिल्ह्यामधील 1133 गावामध्ये यशस्वीपणे राबविली जात आहे.   महाराष्ट्र हे या योजनेच्या अमंलबजावणीमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आहे.   अशी माहिती मंत्री  गुलाबराव पाटील यांनी दिली.  त्यांनी पुढे सांगितले की  , येत्या काळात  अटल भूजल योजना  राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये  राबविण्यासाठी केंद्र सरकार कडे प्रयत्न सूरू आहेत.

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री  दादा भूसे  यांनी अधिकाअधिक ग्रामपंचायतींनी या योजनेत सहभागी होऊन आपल्या गावातील पाण्याची पातळी  वाढवावी ,  असे आवाहन केले . तसेच शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी थकीत अनुदान लवकरच देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी  केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button