ताज्या बातम्यासरकारी योजनासोलापूर जिल्हा

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून आढावा

सोलापूर, (जिमाका), दि. 02 – मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी नियोजित आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रत्येक शासकीय यंत्रणेने हा सोहळा यशस्वी होण्यासाठी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.

            नियोजन भवन येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. संजीव ठाकूर, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, प्रांताधिकारी-1 सदाशिव पडदुणे, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख, अधिक्षक अभियंता संजय माळी, सोलापूर मनपा उपायुक्त मच्छिंद्र घोलप, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख दादासाहेब घोडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. बी. काटकर, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्यासह अन्य सर्व संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार ऑनलाईन द्वारे बैठकीत सहभागी झालेले होते.

            यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी बैठकीत बांधकाम विभागाकडून कार्यक्रम स्थळावर करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती जाणून घेतली. तसेच पार्कींग, वीज पाणी, साफसफाई याबाबतची महापालिकेकडून माहिती घेतली व आवश्यक सूचना दिल्या. सर्व विभागांनी सोपविलेली कामे वेळेत पूर्ण करावीत. कार्यक्रम स्थळी शासकीय विभागांनी समन्वय ठेवून नियोजनबध्द काम करावे. पोलीस विभागाने कार्यक्रमाच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन काटेकोरपणे करावे. वाहतुकीस कोठेही अडथळा निर्माण होणार नाही या अनुषंगाने पार्किंगची व्यवस्था ठेवावी. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी महिला लाभार्थी घेऊन येणे व मेळावा झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी सोडणे यासाठी आवश्यक असलेल्या 400 बसेसची पूर्तता करावी. पुरवठा विभागाने लाभार्थ्यांसाठी जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्याबरोबरच पाणी कुठेही कमी पडणार नाही याची ही दक्षता घ्यावी, असे त्यांनी सुचित केले. या कार्यक्रमासाठी 30 ते 40 हजार महिला लाभार्थी येण्याचे नियोजन करण्यात येत असून त्या अनुषंगाने कार्यक्रमच्या ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button