ताज्या बातम्यासरकारी योजनासोलापूर जिल्हा
जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर 14 ऑगस्ट पासून पैसे जमा होण्यास सुरुवात
या योजनेअंतर्गत जिल्ह्यात 6 लाख 14 हजार 700 अर्ज प्राप्त; त्यापैकी 5 लाख 94 हजार 587 अर्जांना मंजुरी
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते लाभ मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र वाटप
या योजनेचा पुणे येथील राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम लाईव्ह पाहण्यासाठी हुतात्मा स्मृती मंदिर येथे शेकडो लाभार्थी महिलांची उपस्थिती
योजनेचा लाभ मिळाल्याने अनेक लाभार्थी महिला भावुक, भावना व्यक्त करायला शब्दही अपुरे….मुख्यमंत्री व राज्य शासनाचे त्यांनी मानले आभार
सोलापूर, दिनांक 17(जिमाका):- राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी पात्र महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा”राज्यस्तरीय शुभारंभ शिवछत्रपती क्रिडा संकुल बालेवाडी, पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. याचे थेट प्रक्षेपण हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे झाले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते या योजनेचा लाभ मंजूर झालेल्या महिला लाभार्थ्यांना तसेच या योजनेचे अर्ज भरणारे ऑपरेटर यांना प्रतिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र देण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आर. बी. काटकर, जिल्हा परिषदेचे महिला बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, विधानसभा क्षेत्र निहाय स्थापन केलेल्या समित्यांचे अध्यक्ष व सदस्य तसेच सोलापूर जिल्ह्यातील सातशे ते आठशे महिला लाभार्थी उपस्थित होत्या.
सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून ग्रामीण पातळीपर्यंत प्रचार प्रसिद्धी करून ही योजना प्रशासनाने प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवली यामुळे जिल्ह्यात आज रोजी पर्यंत सहा लाख 14 हजार 700 अर्ज प्राप्त झालेले असून विधानसभा क्षेत्र निहाय समित्यांनी त्यातील 5 लाख 94 हजार 587 अर्ज मंजूर केलेले आहेत. दिनांक 14 ऑगस्ट 2024 पासून या योजनेत अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
तालुका निहाय अर्ज मंजूर झालेली संख्या पुढीलप्रमाणे. अक्कलकोट 45 हजार 148, बार्शी 55 हजार 421, करमाळा 33 हजार 635, माढा 43 हजार 247, माळशिरस 66 हजार 254, मंगळवेढा 34 हजार 258, मोहोळ 39 हजार 848, उत्तर सोलापूर 1लाख 6 हजार 581, पंढरपूर 64 हजार 780, सांगोला 42 हजार 930 व दक्षिण सोलापूर 62 हजार 485.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 14 ऑगस्ट रोजी माझ्या बँक खात्यावर 3000 रू जमा झाले. याबद्दल मी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब व शासनाची खूप खूप आभारी आहे. माझ्यासारख्या लाखो बहिणीच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वाची आहे. बँक खात्यावर पैसे जमा झाल्याने खूप खूप समाधान आहे. ही योजना अशीच निरंतर सुरू राहावी. – सौ.भाग्यश्री कोळी, सोलापूर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दिनांक 4 जुलै 2024 रोजी नारीशक्ती दूत ॲपवर ऑनलाईन अर्ज भरला होता. मुख्यमंत्री महोदय दोन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील असे वारंवार सांगत होते. त्यांचे म्हणणे खरे ठरले व 15 ऑगस्ट रोजी माझ्या खात्यावर दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले. त्याचा मला खूप खूप आनंद झाला आहे ही योजना अशीच निरंतर सुरू ठेवावी यातून माझ्या कुटुंबाचा खर्च भागवण्यास मला मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री महोदय व राज्य शासनाचे मी व माझ्यासारखे अनेक बहिणी आभार व्यक्त करत आहेत. – सौ. अंजली बसवराज बेंचे, सोलापूर