गुन्हेगारीताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीयसोलापूर जिल्हा

नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईच्या १३ हजार ६०० रुपयांवर शेतकऱ्याच्या परस्पर मारला दोघांनी डल्ला.

माढा: नैसर्गिक आपत्ती पीक नुकसान भरपाई पोटी शासनाने देऊ केलेली १३ हजार ६०० रुपये रक्कम शेतकऱ्याच्या परस्पर काढून घेतल्याची घटना माढा तालुक्यातील राहुलनगर येथे नुकतीच घडली. संबंधित व्यक्ती आणि आधार प्रमाणीकरण करणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्र चालका विरोधात कारवाई करण्याची मागणी पिडीत शेतकऱ्याने माढा तहसीलदार यांचेकडे केली आहे.

 

सविस्तर हकीकत अशी की, राहुलनगर येथील शेतकरी कुमार भोसले यांचे नैसर्गिक आपत्ती पीक नुकसान भरपाई पोटी १३ हजार ६०० रुपये मंजूर झाले होते. तहसिल कार्यालातील कर्मचाऱ्यांकडून ऑनलाईन माहिती भरताना शेतकरी कुमार भोसले यांच्या आधार नंबर ऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचा आधार नंबर जोडला गेला.

 

कुमार भोसले यांचे यादीला नाव आल्यानंतर आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रात गेले. आधार प्रमाणीकरण करण्याची वेबसाईट बरेच महिने बंद असल्याने भोसले याना आधार प्रमाणीकरण करता आले नाही. अनेकदा आपले सरकार सेवा केंद्रात चकरा मारल्यानंतर जेव्हा वेबसाईट सुरू झाली तेव्हा आधार प्रमाणीकरण करीत असताना त्यांच्या नावापुढे त्यांचा आधार नंबर नसून दुसराच आधार नंबर असल्याचे आणि आधार प्रमाणीकरण यापूर्वीच झाले असल्याचे केंद्र चालकाने सांगितले. आधार प्रमाणीकरण दुसऱ्या व्यक्तीने केले असल्याचा पुरावा केंद्र चालकाने प्रिंट करून भोसले यांना दिला.

 

आपली फसवणूक झाली असल्याचे भोसले यांच्या लक्षात आल्यानंतर यांनी माढा तहसील कार्यालयात सर्व पुराव्यांसह रितसर अर्ज केला. भोसले यांच्या अशिक्षितपणाचा आणि डाटा एंट्रीमध्ये झालेल्या चुकीचा गैरफायदा घेऊन ज्या व्यक्तीचा आधार नंबर जोडला गेला ती व्यक्ती आणि आधार प्रमाणीकरण करणारा केंद्र चालक यांनी कुमार भोसले या शेतकऱ्याची आणि शासनाची फसवणूक केली असल्याचे भोसले यांनी तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिले. १३,६०० रुपयांची परस्पर संगनमताने विल्हेवाट लावणारी व्यक्ती आणि केंद्र चालकाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भोसले यांनी केली आहे.

 

सर्व नाट्यमय प्रकार पाहिल्यास खालील प्रश्न अनुत्तरित राहतात

१. कुमार भोसले या शेतकऱ्याच्या नावापुढे दुसऱ्या व्यक्तीचा आधार नंबर जोडला गेल्याचे त्या व्यक्तीला समजले कसे?

२. आधार नंबर जोडला गेल्याने आधार प्रमाणीकरण करून रक्कम स्वत:च्या खात्यात वळविले जाऊ शकतात हे त्या व्यक्तीला कसे समजले?

३. ज्या व्यक्तीच्या नावाने विशिष्ठ क्रमांक नाहीच मात्र फक्त आधार नंबर जुळतो म्हणून त्याचे आधार प्रमाणीकरण केंद्र चालकाने केलेच कसे?

४. डेटा एन्ट्री करताना झालेली चूक तहसील कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्याचे केंद्र चालकाचे कर्तव्य नव्हते का?

५. आधार प्रमाणीकरण केंद्र चालकाने स्वतः केले की गावोगाव नेमलेल्या एजेंटने केले?

फक्त माढा तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात ठराविक आपले सरकार सेवा केंद्र चालक स्वतःचा आयडी, पासवर्ड वेगवेगळया गावात कमिशनवर चालविण्यास देत आहेत. त्यामुळे संबंधित गावातील आपले सरकार सेवा केंद्रावर विपरीत परिणाम होऊन दिवसेंदिवस अनेक ठिकाणची केंद्र बंद पडत आहेत. नागरिकांना गावातच शासकीय सेवा मिळाव्यात आणि केंद्र चालकाला रोजगार उपलब्ध व्हावा असा शासनाचा स्वच्छ असलेला हेतू साध्य होताना दिसत नाही.

 

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जिल्हा सोसायटीने तक्रार दिलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना अहवाल सादर करण्याबाबत पत्र दिलेले असताना तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकारी यांच्याच पत्राला केराची टोपली दाखवली असल्याचे समोर आले आहे. सर्व केंद्रांचे दिलेल्या सेवांचे रिपोर्ट काढले तर सर्व सत्य समोर येणार आहे. तपासणी करण्यासाठी केंद्राला भेट देऊन काही हाती लागणार नाही हे अधिकाऱ्यांना पण माहीत आहे. पण तपासणीच्या नावाखाली योग्य रीतीने काम करणाऱ्या केंद्र चालकांना नाहक त्रास होतो आणि वस्तुनिष्ठ अहवाल पाठवला जात नाही असा आरोप व्हि.एल.ई.वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष संतोष वाघमारे यांनी केला आहे.

~०००~

आमच्या Youtube चॅनलला अवश्य भेट दया.

जनसंवाद डिजिटल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button