ताज्या बातम्यासोलापूर जिल्हा
Trending

अवैध वाळु उपशाचं पाप उघड होईल म्हणून जिल्हाधिकार्‍यांना चंद्रभागेपासुन दूर ठेवले काय? – गणेश अंकुशराव

जनसंवाद/ पंढरपूर : – चंद्रभागेच्या पात्रात होणारा अवैध वाळु उपसा जिल्हाधिकारी यांना कळू नये, वाळु उपशाचं पाप उघड होईल म्हणून जिल्हाधिकारी यांना आषाढीच्या पार्श्‍वभुमीवरील पाहणीसाठी चंद्रभागेच्या पात्रात महसुल अधिकार्‍यांनी नेले नाही काय? असा सवाल महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केला आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर  पालखी तळांवर, मार्गावर  वारकरी व भाविकांना कोणतही अडचण निर्माण होऊ नये तसेच भाविकांना पालखीतळावर प्रशासनाच्यावतीने अधिकच्या आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद  यांनी आज पालखी तळांची आणि पालखी मार्गाची पाहणी केली. परंतु चंद्रभागेच्या पात्राकडे त्यांना नेण्याचे महसुल अधिकार्‍यांनी टाळले, यामुळे गणेश अंकुशराव यांनी तीव्र नापसंदी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : न भूतो न भविष्यती – माढा तालुक्यात २४ तास अवैध वाळू उत्खननास जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी होणार का?

चंद्रभागेच्या पात्रातील अवैध वाळु उपशामुळं पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्‍न कायम असुन याविरुध्द आम्ही वारंवार वेगवेगळी आंदोलनं केली परंतु पंढरपुरमधील माजी व आजी महसुल अधिकारी मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत, आषाढी वारी तोंडावर आलेली असतानाही चंद्रभागेच्या पात्रात पडलेले खड्डे बुजवले गेले नाहीत, चंदेभागेमध्ये गटाराचे पाणी सोडले जाते, या सर्व बाबी कार्यक्षम जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या निदर्शनास आणुन देणेसाठी पंढरपुरातील महसुल अधिकारी यांनी त्यांना चंद्रभागा वाळवंट व नदीपात्राची पाहणी करण्यासाठी नेणे आवश्यक होते, परंतु जाणुन-बुजून या महसुल अधिकार्‍यांनी आपले पाप उघडकीस येण्याच्या भीतीने जिल्हाधिकारी यांना चंद्रभागेच्या पाहणी दौर्‍यासाठी नेले नाही. असा आरोप गणेश अंकुशराव यांनी केला असुन आता पुन्हा जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांना चंद्रभागा नदी पात्राची पाहणी करण्याची विनंती करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

 

हेही वाचा : नदी काठचे शेतकरी बेहाल; वाळू माफिया आणि वसुलदार मात्र मालामाल.

आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 11 जुलै तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 12 जुलै 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. या पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. या सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा तसेच पालखी तळांवर आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी प्राधान्य द्यावे. तसेच प्रशासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेले जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद  यांनी दिल्या.

 

हेही वाचा : माढा तालुक्यातील वाळू उत्खननाला अधिकाऱ्यांचा वरदहस्त? 

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर, प्रांताधिकारी सचिन इथापे, माळशिरसच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसिलदार सचिन लंगुटे, सुरेश शेजुळ, गटविकास अधिकारी सुशील संसारे, सा.बां.कार्यकारी अभियंता अमित निंबकर, सुनिता पाटील, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले,नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

हेही वाचा : नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई रक्कम अपहाराच्या तक्रारींवर करवाई नाहीच. तक्रारदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न

जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद हे कार्यतत्पर अधिकारी असल्याने त्यांच्याकडून सर्वसामान्य जनतेच्या व वारकरी भाविकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळात चंद्रभागेतील अवैध वाळु उपशाचा व अस्वच्छतेचा प्रश्‍न कायमस्वरुपी मिटावा अशी आमची अपेक्षा असुन आम्ही स्वत: याबाबत जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास वस्तुस्थिती आणून देणार असल्याची माहितीही यावेळी गणेश अंकुशराव  यांनी दिली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button