माढा-करमाळा

आयशर टेम्पोच्या धडकेत ओमनी पलटी, एकजण जखमी.


कुर्डूवाडी दि.१८ : परांडा चौक कुर्डूवाडी येथे आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत ओमनी कारची पलटी झाली. या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी गाडी उभा करून जखमींना बाहेर काढले. ओमनी गाडीत बसलेला एक युवक किरकोळ जखमी झाला असून ताटे देशमुख हॉस्पिटल येथे जखमीवर प्राथमिक उपचार करण्यात आले. ही घटना रविवारी दुपारी ३:३०  वाजनेच्या दरम्यान घडली.


मारूती कंपनीची ओमनी (एम. एच.१२ईम३११०) या क्रमांकाची गाडी परंडा चौकाजवळ येताच बार्शीकडून कुर्डूवाडीच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. आयशरचा वेग जास्त असल्याने दोन्ही वाहनांची टक्कर होताक्षणी ओमनी कार पलटी झाली. ओमनीमध्ये चालकाच्या बाजूस बसलेला युवक जखमी झाला. जमलेल्या गर्दीतील अज्ञात व्यक्तीने जखमीस उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.  चालकास कोणतीही दुखापत झाली नाही.


अपघाताची माहीती मिळताच कुर्डूवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस घटनास्थळी जाईपर्यंत ओमणी चालक आणि आयशर टेम्पो चालक यांच्यात तडजोड झाली होती. ओमनी गाडीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई घेऊन आयशर टेम्पो चालकास तेथून पुढे पाठविण्यात आल्याने पोलिसांना परत जावे लागले. 


कुर्डूवाडी बार्शी मार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दिशादर्शक पट्ट्या नसल्याने रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघातात वाढ झाल्याचे दिसून येते. नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांचे या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याची किंमत वाहन चालकांना मोजावी लागत आहे.


विना परवाना अल्पवयीन मुले बिनदिक्कत भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याची बाब या निमित्ताने समोर आली आहे. मोटासायकल, कार अशी वाहने बेजबाबदार पालक अल्पवयीन मुलांच्या हाती देतात. वाहतुकीचे नियम माहीत नसल्याने आणि भरधाव वेगात वाहने चालवल्याने अपघात होत आहेत. हे अपघात रोखण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई करावी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button