आरोग्य

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून कृष्णा मराठवाडा प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजनांच्या कामांची पाहणी

 


सोलापूर, दिनांक 10(जिमाका):- कृष्णा मराठवाडा प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजनांच्या दहिगाव व मिरगव्हाण येथील कामाची  पाहणी  राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी केली. या अंतर्गत जेऊर ते मिरगव्हाण 27 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे 90% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पुढील सहा महिन्यात पूर्ण करावे असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

    यावेळी या प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता बी. आर. शिंगाडे, कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे, धनंजय सावंत, बालाजी मुंजाळ, सतीश जैन व अन्य अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

    कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्प अंतर्गत योजना क्रमांक 1 टप्पा 1 च्या कामाविषयी सविस्तर माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी घेऊन जेऊर ते मिरगव्हाण बोगद्याच्या कामाची पाहणी केली. या बोगद्याचे एकूण लांबी 27 किलोमीटर इतकी असून 24 किलोमीटरचे काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित तीन किलोमीटरचे काम ही पुढील सहा महिन्यात पूर्ण होऊन या बोगद्यातून उजनी धरण 100% भरल्यानंतर ओव्हर फ्लो होऊन जे पाणी बाहेर पडणार आहे ते पाणी वाया जाऊ न देता या बोगद्यातून सीना नदीत सोडले जाणार आहे, असे श्री. सावंत यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर असल्याचेही त्यांनी सांगितले.

      कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत उपसा योजनांच्या कामांची सविस्तर माहिती अधीक्षक अभियंता श्री. शेंडगे यांनी देऊन जेऊर ते मिरगव्हाण बोगद्याच्या कामाची ही माहिती दिली. तसेच या बोगद्याचे उर्वरित 3 किलो मीटर चे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

     या प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या दहिगाव येथील काही शेतकऱ्यांचा सत्कार आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button