करमाळा येथे डोंगर, झाडी, हाटील असताना गुवाहाटीचे नियोजन करण्याची गरज नव्हती : संजय आवटे – Jansanvad
ताज्या बातम्या

करमाळा येथे डोंगर, झाडी, हाटील असताना गुवाहाटीचे नियोजन करण्याची गरज नव्हती : संजय आवटे

प्रकाशक: एस.एस.वाघमारे

२०१७ साली युतीची सत्ता असताना मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडली होती.

आजपर्यंत साधारण २१ हजार रुग्णांना वैद्यकिय निधीतून लाभ 


करमाळा प्रतिनिधी: करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने माढा, करमाळा, कर्जत, जामखेड, परंडा तालुक्यातील पत्रकारांसाठी करमाळा येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जेष्ठ पत्रकार संजय आवटे, राजा माने, जयंत जाधव, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, ॲड. डॉ. बाबुराव हिरडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, शिवसेना नेत्या ज्योतीताई वाघमारे, ज्येष्ठ नेते विलासराव घुमरे, पत्रकार संघाचे सचिव नासीर कबीर आदी मान्यवरांनी संबोधित केले. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 


जनतेची बाजू घेऊन सत्याची कास धरून सत्ताधाऱ्यांना व प्रस्थापितांना जाब विचारणारा खरा पत्रकार असतो. राजकीय व्यक्तींना हवी तशी बातमी छापणारा पीआर असतो तर  राजकारणी लोकांना अपेक्षित नसणारी बातमी छापतो तो पत्रकार असतो. पत्रकारांची लेखणी सातत्याने सर्वसामान्यांच्या बाजूने झिजली पाहिजे असे मत ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत संजय आवटे यांनी व्यक्त केले.करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित एक दिवशीय पत्रकार कार्यशाळा शिबिरामध्ये ते बोलत होते.

राज्यात सत्तांतर घडवून आणले जात असताना मंगेश चिवटे यांनी गुवाहाटी ऐवजी करमाळा निवडले असते तर इथे कामाख्या देवी ऐवजी कमला भवानी देवी होती, आमच्याकडेही डोंगर, झाडे, हॉटेल उपलब्ध होते त्यामुळे सर्वांना गुवाहाटी ऐवजी करमाळा येथे आणण्याचे नियोजन करायला हवे होते असे संजय आवटे मिश्कीलपणे बोलले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटची पत्रकार परिषद घेऊन दहा वर्ष झाली असल्याचीही त्यांनी आठवण करून दिली.

सरकारच्या योग्य कामाला दाद देत चुकीच्या धोरणाला विरोध करण्यासोबतच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील अनेक किस्से सांगितले. सत्ता कोणाचीही असो पत्रकारांनी सतत जनतेच्या न्याय हक्कासाठी लढले पाहिजे हीच खरी पत्रकारिता असल्याचे प्रतिपादन केले.


व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार राजा माने (Raja Mane), दैनिक सकाळचे पिंपरी चिंचवड (Pimpari chinchavad) निवासी संपादक जयंत जाधव (Jayant Jadhav), मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख श्री.मंगेश चिवटे (Mangesh Chivate), शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे (Jyoti Waghmare), युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलास घुमरे, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, माढा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक दीक्षित, विनायक पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आरती बसवंती (Arati Basvanti), वैद्यकीय अधिकारी कोमल शिर्के, वीज वितरण महामंडळाचे रघुनाथ शिंदे, पत्रकार एडवोकेट बाबुराव हिरडे आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना संजय आवटे पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील पत्रकारांना सर्व प्रश्नांची चांगली जाण असते, अनेक बताम्यांपैकी दर महिन्यात एखादी तरी बातमी ग्रामीण भागातील पत्रकारांनी राज्य पातळीवर गाजेल अशा पद्धतीने प्रसिद्ध केली पाहिजे. सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक विषय असतात मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. असे सार्वजनिक प्रश्न शोधून त्यावर प्रकाश टाकून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावेत. आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटून सर्वसामान्यांना न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला आपली लेखणी प्रस्थापितांच्या, व्यवस्थेच्या विरोधात जनतेसाठी झिजवावी लागणार आहे.


ज्येष्ठ पत्रकार राजा माने (Raja Mane) म्हणाले की, पत्रकार हा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचा आधार असून सर्वसामान्यांच्या व्यथा व्यवस्थेपुढे मांडून त्या सोडवून घेण्याचे काम पत्रकार करू शकतो.


बोलताना ज्योतीताई वाघमारे म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुरू असलेली वैद्यकीय सेवा कौतुकास्पद असून पत्रकारांनी या सेवा जनतेपर्यंत पोहचवाव्यात. पत्रकारांनी आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी सातत्याने प्रशासनापुढे  मांडाव्यात.


आदर्श पत्रकार पुरस्काराचे वितरण

शितलकुमार मोटे (टीव्ही 9 मराठी), शेखर स्वामी (दिव्य मराठी), सिद्धार्थ वाघमारे (संघर्ष न्यूज), विशाल परदेशी (तेजवार्ता), सचिन जव्हेरी (जनमत), प्रवीणकुमार अवचर (कृषी सहकार) यांना अनुक्रमे पाच हजार एक रुपये, तीन हजार एक रुपये, दोन हजार पाचशे एक रुपये, दोन हजार एक रुपये, एक हजार पाचशे एक रुपये अशा पारितोषिक रकमेसह सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


यावेळी बोलताना मंगेश चिवटे म्हणाले की पत्रकार हा प्रशासकीय व्यवस्था व जनतेमधील दुवा असला पाहिजे. वैद्यकीय मदत कक्षातून आत्तापर्यंत २१ हजार नागरिकांचे प्राण वाचविण्यात आम्हाला यश आले असल्याचे श्री.चिवटे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसताना केरळ येथे पुर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर श्री.एकनाथ शिंदे, डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मदत कार्य करण्यासाठी पाठवलेल्या समूहाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी लीलया पार पाडली. केरळ येथील अनुभवाचा फायदा आता राज्यातील जनतेला होत असल्याचेही श्री.चिवटे यांनी सांगितले.


बोलताना जयंत जाधव म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या बातम्या देत असताना त्याचे पुरावे जमा करण्याचे काम पत्रकारांनी करून शोध पत्रकारिता केली पाहिजे. उदात्त हेतूने एखाद्या प्रस्थापित नेत्याच्या किंवा अधिकाऱ्याच्या विरोधात प्रकाशित केलेल्या बातमीवर कोणीही हरकत घेतल्यास शेवटी विजय हा पत्रकरांचाच होत असल्याने समाजात घडणाऱ्या अयोग्य घटनेविरुद्ध लिहिताना कुणाचाही मुलाहिजा ठेवण्याची गरज नाही असेही त्यांनी सांगितले.


यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, सचिव नासीर कबीर, किशोर कुमार शिंदे, अशोक नरसाळे, अशपाक सय्यद, सुनील पुजारी, सचिन जवेरी, विशाल परदेशी, नागेश शेंडगे या सर्व पत्रकारांनी परिश्रम घेतले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार आशपाक सय्यद यांनी तर सुत्रसंचलन किशोरकुमार शिंदे यांनी केले. आभार पत्रकार प्रा. अशोक नरसाळे यांनी मानले.

०००००००००

बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क 9527271389

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button