ताज्या बातम्यासोलापूर जिल्हा

जिल्ह्यातील डाळिंब फळ पिकाच्या क्षेत्रात भरीव वाढ करण्यासाठी नव तंत्रज्ञानाचा वापर करणार -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची डाळिंब संशोधन केंद्रास भेट

  • सोलापूर जिल्ह्याला डाळिंब फळ पिकाच्या उत्पादनात पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे आवाहन

  • बीबीदारफळ येथील डाळिंब फळ पिकाच्या एक खोड लागवड पद्धत तर पाकणी येथील परंपरागत लागवड पद्धतीच्या प्लॉट ला भेट

  • कृषी विभागाच्या स्मार्ट योजनेअंतर्गत जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणार

सोलापूर, दिनांक 23(जिमाका):-डाळिंबाचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची एक विशेष ओळख आहे. परंतु मागील काही वर्षापासून डाळिंब फळ पिकावर पडणारे विविध रोग व त्यातून डाळिंबाचे कमी दर्जाचे पीक आल्याने न मिळणारा भाव यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी डाळिंब फळ पिकापासून दूर जात असल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी व येथील शेतकरी पुन्हा डाळिंब पिकाकडे आकर्षित होऊन सोलापूर जिल्ह्याला डाळिंब फळ पिकात पूर्वीचे गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी डाळिंब उत्पादनात नव तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

             जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र येथे भेट देऊन येथील डाळिंब फळ पिकावर व त्यातील नव तंत्रज्ञानावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ श्री. मराठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे यांच्यासह अन्य शास्त्रज्ञ उपस्थित होते.

             जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब फळ पिकाच्या क्षेत्रात भरघोस वाढ करणे तसेच येथील शेतकऱ्यांना डाळिंब फळ पिकातून मोठ्या प्रमाणात आर्थिक समृद्धी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याच अनुषंगाने सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रास भेट देऊन येथील शास्त्रज्ञ यांच्याशी त्यांनी चर्चा केली. डाळिंब फळ पिकावर पडणाऱ्या विविध रोगावर प्रतिकार करण्यासाठी दर्जेदार डाळिंब पिकाचे वाण तसेच विविध प्रतिबंधात्मक औषधी तसेच या पिकाच्या उत्पादनासाठी नव तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि शेतकऱ्यांना याविषयी प्रशिक्षित करण्यासाठी डाळिंब संशोधन केंद्राची कशा पद्धतीने मदत होईल याविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली.

            कृषी विभाग व आत्मा यांच्या समन्वयातून जिल्ह्यातील डाळिंब पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संवाद साधण्यात येणार असून डाळिंब फळ पिकाच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.

             बीबीदारफळ येथील डाळिंब उत्पादक शेतकरी श्री. संतोष निळ यांच्या डाळिंब पिकाच्या प्लॉटला जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी भेट दिली. शेतकरी संतोष निळे यांनी डाळिंब पिकाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी नवीन लागवड पद्धतीचा वापर केलेला आहे. ही पद्धत म्हणजे एक खोड लागवड पद्धत होय. ही पद्धत बैरागवाडी तालुका माढा येथील शेतकरी प्रवीण माने यांनी विकसित केलेली आहे. या एक खोड लागवड पद्धतीमुळे डाळिंब फळ पिकाच्या उत्पादनात भरघोस वाढ मिळते अशी माहिती श्री.माने यांनी यावेळी दिली.

             पाकणी येथील डाळिंब पिकवणारे शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी डाळिंब फळ पिकाच्या परंपरागत लागवड पद्धतीची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी संबंधित शेतकऱ्यांची डाळिंब फळ पिकाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करून जिल्ह्यातील डाळिंब फळ पिकाचे क्षेत्र वाढवणे यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करेल, प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

भूसेवा शेतकरी उत्पादक कंपनी:-

            मोहोळ तालुक्यातील हिवरे येथील भूसेवा शेतकरी उत्पादक कंपनीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट देऊन या कंपनीच्या कामकाजाची माहिती घेतली तसेच कंपनीला पुढील काळात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास ती सोडवण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. यावेळी कंपनी जवारीचे क्लिनिंग, ग्रेडिंग, ब्रॅण्डिंग, पॅकेजिंग आणि मार्केटिंग कशा पद्धतीने करत आहे याविषयीची माहिती त्यांनी जाणून घेतली. कृषी विभागाच्या स्मार्ट योजनेअंतर्गत आणखी शेतकरी उत्पादक कंपन्या जिल्ह्यात कशा पद्धतीने स्थापन करता येतील याविषयी कृषी विभाग व आत्मा ने नियोजन करावे असेही त्यांनी सूचित केले.

            ही भूसेवा शेतकरी उत्पादक कंपनी ज्वारी उत्पादनात अग्रेसर असून या कंपनीचा न्यूट्री सोर्घ हा ब्रँड महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला आहे, अशी माहिती कंपनीचे प्रमुख सचिन थिटे यांनी दिली.

            यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, प्रकल्प संचालक आत्मा मदन मुकणे, तालुका कृषी अधिकारी अतुल पवार व कृषी विभागातील सर्व अधिकारी तसेच भुसेवा शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button