ताज्या बातम्यामाढा-करमाळासोलापूर जिल्हा

पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास आंदोलन.

खरीप हंगाम २०२३ उडीद, तूर व इतर सर्व पिकांचा पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास माढा कृषी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे १३ जून रोजी आंदोलन

म्हैसगाव दि.२९ : खरीप हंगाम 2023 च्या हंगामातील उडीद, तूर व इतर सर्व पिकांच्या पिक विम्याची रक्कम दिनांक १२ जून पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा न केल्यास गुरुवार दिनांक १३ जून रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माढा कृषी कार्यालय समोर हलगी नाद व घंटा नाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे यासंदर्भाचे निवेदन नायब तहसीलदार श्री. लोकरे यांना देण्यात आले.

यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीभाऊ पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष आजिनाथ बापू परबत, स्वाभिमानी पक्षाचे माढा तालुका अध्यक्ष सत्यवान गायकवाड प्रसिद्धी प्रमुख मालोजी आडकर सरमाढा तालुका कार्याध्यक्ष नवनाथ उबाळे दत्तात्रय पंडित व इतर उपस्थित होते.

शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम वितरित करण्यात यावी यासाठी माढा कृषी कार्यालय यांना वारंवार लेखी निवेदन देऊन व घंटानाद आंदोलन करून सुद्धा कार्यालयाने दखल घेतली नाही. वास्तविक पाहता गेल्या वर्षी दुष्काळ असल्यामुळे पिके वाया गेली, त्यामुळे पिक विम्याची रक्कम ताबडतोब मिळणे गरजेचे असताना विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहे हे सरकारच्या निदर्शनास आणून देखील त्या संदर्भामध्ये या विषयाकडे दुर्लक्ष झालेले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatna) उडीद व तूर या पिकाचा समावेश करावा म्हणून वारंवार पाठपुरावा केला आहे. विमा कंपनीने २५% अग्रीम बोनस देणे गरजेचे असताना रक्कम देण्यास टाळाटाळ केली आहे. विमा कंपनी कुणालाच जुमानत नसल्याने विमा कंपनी (Insurance company) सरकारचं साठं-लोटं आहे का असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याने सरकारला जाग यावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे घंटानाद व हलगी नाद आंदोलन माढा कृषी कार्यालयासमोर ठेवण्यात आले आहे.

माढा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अजिनाथ बापू परबत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button