माझ्या शेतात अवैध वाळूचा स्टॉक का करतो म्हणून विचारणा केल्याने एकास मारहाण, दोघांवर (अदखलपात्र) गुन्ह्याची नोंद.
Jansanvad03/06/2024
0 1 minute read
जनसंवाद/माढा : उंदरगाव (ता.माढा) येथील ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय परशुराम आरे वय ६० वर्ष यांच्या शेतात दशरथ रामदास नाईकवाडी, सचिन रामदास नाईकवाडी हे वाळूचा स्टॉक करीत होते. माझ्या शेतात वाळूचा स्टॉक का करता असे विचारल्याने दत्तात्रय आरे यांना मारहाण करण्यात आली. ही घटना रविवार दि.२ रोजी १२ वाजनेच्या सुमारास घडली.
यातील फिर्यादी दत्तात्रय परशुराम आरे यांची उंदरगाव येथे सिना नदीलगत शेती आहे. दत्तात्रय आरे हे सोलापूर येथे राहतात. दत्तात्रय आरे हे काल (रविवार) शेतात आले असता ट्रॅक्टरच्या साहाय्याने सीना नदीतून उपसा केलेली वाळू त्यांच्या शेतात आणून साठवली जात असल्याचे त्यांनी पाहिले. आरे यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे पुराव्यासाठी व्हिडिओ आणि फोटो काढले आणि माझ्या शेतात वाळू का टाकता अशी विचारणा केली असता दशरथ रामदास नाईकवाडी आणि सचिन रामदास नाईकवाडी दोघे रा. उंदरगाव (ता.माढा) यांनी आरे यांना दमदाटी, शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर आरे यांनी माढा पोलीस ठाण्यात तक्रार केली.
दशरथ रामदास नाईकवाडी आणि सचिन रामदास नाईकवाडी यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३२३, ५०४, ५०६, ३५ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून स.पो.नि.श्री.बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक कारवाई पो.हे.कॉ. श्री.सातपुते हे करीत आहेत.
दत्तात्रय आरे यांनी जनसंवादशी बोलताना अनेक धक्कादायक खुलासे केले असून अवैध वाळू उत्खननामध्ये अनेक अधिकारी सामील असल्याचा त्यांचा आरोप आहे. अवैध वाळू माझ्या शेतात का टाकता असा जाब विचारला तर काल मारहाण झाली, तक्रार दिल्याने भविष्यात माझ्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे श्री. आरे यांनी सांगितले. संपूर्ण तालुक्यात २४ तास सुरू असलेले वाळू उत्खनन आणि वाळू वाहतूक पाहिली तर वाळू तस्करांना अभय असल्याचे स्पष्ट दिसून येते.