ताज्या बातम्यामहाराष्ट्रमाढा-करमाळारणसंग्रामराजकीयसोलापूर जिल्हा
चुरशीच्या लढतीत नारायण आबा पाटील १६०८५ मताधिक्याने विजयी
मोहिते पाटलांनी जयवंतराव जगताप आणि नारायण आबा पाटील यांच्यात घडवून आणलेला सलोखा हे या विजयामागील उघड गुपित

- महाराष्ट्रात एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली.
- २००९ ला ६६.५७ टक्के, २०१४ ला ७२.७३ टक्के, २०१९ ला ७१.०५ टक्के मतदान झालेले होते.
जनसंवाद न्युज नेटवर्क, दि.२३ : करमाळा (Karmala) विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाचे उमेदवार माजी आमदार नारायण (आबा) गोविंदराव पाटील (Narayan Aba Patil) हे विजयी ठरले. तिरंगी लढतीत तब्बल ९६०९१ मते मिळवत विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर १६०८५ मतांची आघाडी घेत विजय सलामी दिली. करमाळा विधानसभेची निवडणूक ‘कांटे की टक्कर’ समजली जात होती.
करमाळा विधानसभा जागेसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाले. यावेळी महायुतीतील शिवसेना पक्षाने करमाळा विधानसभेसाठी दिग्विजय दिगंबरराव बागल यांना उमेदवारी दिली होती. तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नारायण (आबा) गोविंदराव पाटील यांना उमेदवारी दिली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालात करमाळाची जागा जिंकणारे संजयमामा विठ्ठलराव शिंदे हे अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
करमाळा विधानसभा निवडणुकीत ३ लाख २८ हजार ९९४ मतदारांपैकी २ लाख २९ हजार ३७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६९.७२ टक्के मतदान झाले. मतदारसंघात समाविष्ट असलेल्या माढा तालुक्यातील कुर्डूवाडीसह ३६ गावांतून झालेले आणि न झालेलेही मतदान निवडणूक निकालात निर्णायक ठरले आहे.
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये लागलेले निकाल विधानसभेतील सत्ता समीकरणाच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरले. महाराष्ट्रात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक दिग्गजांनी रांगा लावल्याचेही पाहायला मिळाले.
मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आ.संजयमामा शिंदे यांना कुर्डूवाडीसह ३६ गावांतील मताधिक्यामुळेच विजय मिळवता आला होता. यावेळी २०२४ च्या निवडणुकीत मागच्या २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान वाढले आहे मात्र टक्केवारी घसरली. संजयमामांसाठी वरदान ठरलेल्या ३६ गावातून आमदार नारायण पाटील यांनी २०१९ च्या तुलनेत मुसंडीच मारली असे म्हणता येईल.
नारायण आबा पाटील यांना निवडून येण्यास पोषक ठरलेल्या बाबी:
जयवंतराव जगताप आणि नारायण आबा पाटील यांच्या मोहिते पाटलांनी घडवून आणलेला सलोखा याठिकाणी महत्त्वपूर्ण ठरला. माढाचे उमेदवार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी ३६ गावातील ऊस बागायतदार शेतकऱ्यांना ऊस गाळप करण्याचा दिलेला शब्द, हे सुद्धा नारायण आबा पाटलांच्या पथ्यावर पडले.
निर्णायक ठरणाऱ्या कुर्डूवाडी शहरात २३ हजार ६०० पैकी १२ हजार ७५६ मतदान झाले. कमी झालेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार याबाबत नागरिकात उत्सुकता होती. कुर्डूवाडीसह ३६ गावातील अनेक मतदार धर्मसंकटात सापडल्याने त्यांनी मतदान केंद्राकडेच पाठ फिरवल्याची चर्चा निकलापूर्वी होत होती. याचा फटका निश्चितच संजयमामा शिंदे यांना बसला असावा असा तर्क निकाल पाहून अनेक तज्ञांकडून लावला जात आहे.