सार्वजनिक बांधकाम विभागातील गल्लीपासून जिल्ह्यापर्यंतचे कर्मचारी गायबच.
प्रकाशक : एस.एस.वाघमारे
सोलापूर दि.२३ : सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागातील कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित नसतात हे वारंवार दिसून आले आहे. जिल्ह्यातील सर्व उपविभागांवर नियंत्रण ठेवणारे सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर २ यांच्या कार्यालयातील कर्मचारीही कार्यालयीन वेळेत खुर्चीतून गायब असल्याचे आज आढळून आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर २ या कार्यालयातील दुपारी ३ नंतर जवळपास सर्व खुर्च्या रिकाम्या दिसल्याने कर्मचारी रजेवर आहेत का अशी चौकशी केली असता सदरील कर्मचारी जेवण करण्यासाठी आत्ताच गेले असल्याची माहिती मिळाली. १ तासाने दुसऱ्या व्यक्तीमार्फत चौकशी केली असता परत तेच उत्तर मिळाले.
३ वाजता चौकशी केली असता सदरील कर्मचारी जेवणासाठी गेलेले असल्याचे सांगितले गेले, ४ वाजता चौकशी केली तरीही जेवणासाठी बाहेर गेले असल्याचे सांगितले गेले. सर्व शासकीय कार्यालयातील जेवणाची वेळ 1 वाजता असताना सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जेवणाची वेळ सायंकाळी ६ वाजेपर्यंत केव्हाही असते का हा प्रश्न निर्माण होत आहे. कर्मचारी नसताना सताड उघडे असलेल्या कार्यालयातील पंखे मात्र अहोरात्र सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. हजारो रुपयांची लाईट विनाकारण जाळली जात असून याचा भुर्दंड सर्वसामान्य जनतेवर पडत आहे.
याबाबत कार्यकारी अभियंता श्री.हेमंत चौगुले यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक 8551999917 वर कॉल केला असता त्यांनी कॉल घेतला नाही. या नंबरवर केव्हाही कॉल केला तरी ते कॉल घेत नाहीत अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. लोकसेवक हे राजा प्रमाणे वागत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही ही जिल्ह्याची शोकांतिका आहे.
कार्यकारी अभियंता २ सोलापूर यांच्या कार्यालयामध्ये अभ्यागतांना बसण्याची कोणतीही व्यवस्था नाही. अधिकारी एसी मध्ये बसतात मात्र विविध कामासाठी जाणाऱ्या अभ्यागतांना साधी बसण्याची ही व्यवस्था नसल्याने येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करीत नागरिकांना इकडे – तिकडे फेऱ्या मारत राहावे लागते. अभ्यागतांना बसण्याची व्यवस्था त्वरित करण्यात यावी यासाठी येथे उपस्थित नागरिकांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचेकडे तसा पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील विविध कामांसाठी ठेकेदार आणि विविध प्रश्नांसाठी नागरिक या कार्यालयामध्ये ये जा करीत असतात. कार्यालयीन वेळेत अनेक कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसतात त्यामुळे संबंधित कर्मचारी, अधिकारी यांची प्रतीक्षा करीत नागरिकांना तासनतास उभा राहून अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागते. ठेकेदार मात्र उपस्थित नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही खुर्चीत आरामात बसलेले दिसून येतात.
सदरील परिस्थिती पाहता भारतीय नागरिकांच्या महसुलातून वेतन घेणारे लोकसेवक नागरिकांना दुय्यम वागणूक देत असल्याचे समोर आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोट्यावधींची विकास कामे केली जातात. मात्र जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी साधी बसण्याची सोय असू नये ही लोकशाहीची लक्षणे अजिबात नाहीत.
येथील अधिकारी हे नागरिकांपेक्षा ठेकेदारांचे फोन घेण्यात व्यस्त असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. अधिकाऱ्यांच्या ओळखीच्या व्यक्तींचे किंबहुना फायद्याच्या व्यक्तींचे फोन घेण्यात अधिकाऱ्यांना रस असतो. अनेक समस्या घेऊन गेलेल्या नागरिकांना अधिकारी भेटत नाहीत. फोन केला तरी फोन उचलत नाहीत. सदृढ लोकशाहीसाठी यापेक्षा वाईट काय असू शकते?
अनेक कर्मचारी ८-८ दिवस कार्यालयामध्ये उपस्थित राहत नाहीत, आठवड्यातून एकदा येऊन हजेरी पटावर आठवड्याच्या सह्या एकाचवेळी करून निघून जातात अशा अनेक तक्रारी सोलापूर जनसंवादकडे आलेल्या आहेत. सोलापूर जनसंवादने याबाबत तालुक्यात शहानिशा केली असता कर्मचारी आणि अधिकारी कार्यालयामध्ये येत नसल्याचे आढळून आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम विभागाच्या सर्व कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक प्रणाली सुरू करण्यासाठी जनतेतून मागणी वाढत आहे. यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या बायोमेट्रिक उपकरणे दिसून येत नसल्याने या बायोमेट्रिक उपकरणाबाबत विचारणा केली जात आहे.