ताज्या बातम्यासामाजिक-सांस्कृतिकसोलापूरसोलापूर जिल्हा

जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 6 लाख 15 हजार अर्ज प्राप्त -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

*तालुकास्तरीय तपासणी समितीकडून 5 लाख 48 हजार अर्ज जिल्हास्तरीय समितीकडे वर्ग. | प्रशासनाकडे प्राप्त झालेले 4 लाख ऑफलाईन अर्ज अत्यंत गतिमान पद्धतीने ऑनलाईन करण्यात आले

सोलापूर, दिनांक 7(जिमाका):- राज्य शासनाची अत्यंत महत्वकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात सर्वत्र प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही जिल्ह्यात या योजनेची प्रचार प्रसिद्धी सुरू असून दिनांक 7 ऑगस्ट 2024 सायंकाळी पाच वाजेपर्यंत 6 लाख 14 हजार 970 अर्ज या योजनेत तालुकास्तरीय समितीकडे प्राप्त झालेले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील एक ही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा दक्ष राहून काम करत आहे. ग्राम स्तरावर अशा सेविका ग्रामसेवक त्यांच्याकडे अर्ज प्राप्त होत आहेत तर महा-ई-सेवा केंद्रा द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज अपलोड केले जात आहेत. जिल्हा महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचा महिला बाल विकास विभाग आदी विभागाच्या वतीने अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून ही योजना सर्वसामान्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यात प्रशासनाला यश प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम स्तरावर अंगणवाडी सेविका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याचे अर्ज भरून घेत आहेत. तसेच प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना या योजनेविषयी सविस्तर माहिती देऊन कोणत्या कागदपत्राची पूर्तता करणे गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन अंगणवाडी सेविकेकडून केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात या योजनेचे अर्ज भरण्यासाठी पात्र महिला मोठ्या संख्येने येत आहेत.
या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरापर्यंत अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेले असल्याने जवळपास चार लाख अर्ज ऑफलाइन पद्धतीने प्रशासनाकडे प्राप्त झालेले होते. तर नारीशक्ती दूत ॲपवर दोन लाख पंधरा हजार अर्ज ऑनलाईन प्राप्त झालेले आहेत. ऑफलाइन पद्धतीने प्रशासनाकडे आलेले सर्व अर्ज अत्यंत गतीने ऑनलाईन करण्यात आलेले आहेत. प्राप्त सर्व अर्जांची तपासणी तालुकास्तरीय तपासणी समितीने केलेली असून यातील 5 लाख 48 हजार 659 अर्ज समितीने जिल्हास्तरीय समितीकडे पाठवलेले आहेत तर 59 हजार 389 अर्ज कागदपत्रांच्या त्रुटीमुळे रद्द करण्यात आलेले असून कोणत्या कागदपत्राची कमतरता आहे याविषयीचा मेसेज संबंधित लाभार्थ्याच्या मोबाईलवर तालुकास्तरीय समितीने पाठवलेले आहेत. रद्द केलेल्या अर्जावर संबंधित लाभार्थ्यांनी त्रुटीबाबतचे कागदपत्र अपलोड केल्यास त्यांचे अर्ज पुन्हा जिल्हास्तरीय समितीकडे वर्ग करण्यात येणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी आर. बी. काटकर व जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली आहे.
तालुकास्तरीय समितीकडून प्राप्त झालेले 5 लाख 48 हजार अर्ज यावर जिल्हास्तरीय समिती कडून छाननी करण्यात येऊन विधानसभा क्षेत्रनिहाय गठित होणाऱ्या समितीची अंतिम मंजुरी घेऊन पुणे येथील आयुक्त महिला व बालविकास यांच्याकडे पाठवण्यात येणार आहेत. आयुक्त महिला व बालकल्याण पुणे यांच्याकडे प्राप्त झालेल्या मंजूर अर्जावर महिला व बालकल्याण आयुक्त कार्यालयाकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्याची कार्यवाही होणार आहे.
जिल्ह्यात तालुकास्तरीय समितीकडे प्राप्त झालेल्या अर्जावर तालुकास्तरीय समितीकडून छाननी करण्यात येऊन जिल्हास्तरीय समितीकडे पाठवण्याची टक्केवारी 89.22% इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button