मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजेनेचे जिल्ह्यात ॲपद्वारे 3 हजार 500 ऑनलाईन अर्ज प्राप्त – Jansanvad
ताज्या बातम्यासरकारी योजनासोलापूरसोलापूर जिल्हा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजेनेचे जिल्ह्यात ॲपद्वारे 3 हजार 500 ऑनलाईन अर्ज प्राप्त

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजना राबविण्यात सोलापूर जिल्हा अग्रेसर ठेवावा -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

प्रत्येक शासकीय विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त सुरू असलेली सर्व कामे अत्यंत काटेकोरपणे पूर्ण करून घ्यावीत.

सोलापूर, दिनांक 6(जिमाका):- मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे. शासनाने या योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त महिलांना घेता यावा यासाठी यात अत्यंत सुटसुटीतपणा आणलेला आहे. तरी सोलापूर जिल्ह्यात या योजनेची प्रचार प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर करून 21 ते 65 वयोगटातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहील यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

       नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील विविध विभागांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता संजय माळी, उपजिल्हाधकारी संतोष देशमुख, महिला व बालकल्याण जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद. मिरकाले, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेत राज्यातील सुमारे तीन कोटी महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये शासन देणार असून यासाठी प्रतिवर्षी 46 हजार कोटीची तरतूद केलेली आहे. ही शासनाची महत्त्वकांक्षी योजना जिल्ह्यातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना व्यवस्थितपणे समजली आहे का? तसेच या योजनेतील तरतुदी सर्वसामान्य महिला पर्यंत पोहोचण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करावेत याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी संबंधित यंत्रणेला केले. तसेच राज्य शासन महिलांसाठी राबवत असलेल्या अन्य योजनांची सविस्तर माहिती देऊन महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

     खरीप हंगाम 2023 मधील पाच लाख एकोणीस हजार शेतकरी लाभार्थ्यांना 689 कोटीचे अनुदान प्राप्त झालेले असून त्यातील 33 हजार 768 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 489 कोटीचे वाटप झालेले आहे तरी उर्वरित शेतकरी खातेदारांच्या बँक खात्यावर अनुदान रक्कम त्वरित पाठवण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा असे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी देऊन जिल्ह्यातील खरीप पेरणीची माहिती घेऊन शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा मुबलक पुरवठा होईल या अनुषंगाने कृषी विभागाने दक्षता बाळगावी. तसेच पिक विमा 2023 अंतर्गत शेतकऱ्यांना 216 कोटी 25 टक्के आग्रिम मिळणे अपेक्षित असताना ते 136 कोटी मिळालेले असून उर्वरित अग्रीम रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी निर्देशित केले.

      पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की जिल्ह्यातील ज्या विभागांना मंत्रालय स्तरावरून निधी मिळणे अपेक्षित आहे अशा मंत्रालय विभागांना पत्र देऊन सदरचा निधी संबंधित जिल्हास्तरीय यंत्रणांना पाठवण्याबाबत पालकमंत्री कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले. जलयुक्त शिवार अभियान 1.0 मध्ये मधील कामांचा आढावा घ्यावा. या अभियानाचा फायदा शेतकऱ्यांना झाला का याची खात्री करावी. तर जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये उर्वरित 233 गावामध्ये पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी प्रभावीपणे काम करावे, असे त्यांनी सूचित केले.

     सोलापूर जिल्ह्यातील पायाभूत प्रकल्पाचा आढावा घेत असताना सोलापूर शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न मागील काही वर्षांपासून प्रलंबित असून यासाठी पुढील दौऱ्यात स्वतंत्र आढावा बैठक घेण्यात येऊन हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे श्री. पाटील यांनी सांगितले. तसेच सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम पूर्ण होत आलेले असून महापालिकेच्या माहितीनुसार माहे नोव्हेंबर 2024 पर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येईल. तरी या सर्व पाणीपुरवठा पाईपलाईनच्या कामकाजाची पाहणी लवकरच करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक शासकीय विभागाने त्यांच्या विभागामार्फत सुरू असलेल्या विविध विकास कामे विहित कालावधीत मार्गी लागतील त्यासाठी दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

      यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रशासन करत असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती बैठकीत दिली. तसेच महिला व बाल विकास विभागाच्या नारी ॲपवर 3500 अर्ज ऑनलाईन प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी बियाणे व खताचा मुबलक साठा उपलब्ध झाला असून त्या अनुषंगाने प्रशासन दक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत असलेल्या विकास कामांची माहिती, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी शेतकऱ्यांना अनुदान वाटप माहिती, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांनी कृषी विभागाची माहिती, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यात आलेल्या अर्जांची माहिती, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी रस्त्यांची माहिती बैठकीत सादर केली.

पालकमंत्री यांची महा-ई-सेवा केंद्र ला भेट-

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर शहरातील एका महा-ई-सेवा केंद्राला भेट दिली. यावेळी त्या केंद्रावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. त्या प्रक्रियेची सविस्तर माहिती पालकमंत्री यांनी घेतली. तसेच ऑनलाइन अर्ज यशस्वीपणे अपलोड केलेल्या दोन महिलांना प्रातिनिधीक स्वरूपात ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button