म्हैसगांव दि.२२: आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कुर्डूवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुरेश चिल्लावार यांनी सायंकाळी ७:३० दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात शांतता बैठक घेतली. गावातील गणेश मंडळांची माहिती पोलीस पाटील श्री, हनुमंत चांदणे यांनी दिली. बैठकीसाठी गावातील आणि वाडी-वस्तीवरील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
प्रत्येक मंडळाने परवाना घेऊनच गणेशोत्सव साजरा करावा. संपूर्ण गणेशोत्सव कालावधीमध्ये भांडण होणार नाही, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्व मंडळांनी खबरदारी घेण्याचे आवाहन श्री. चील्लावार यांनी केले.
गणेशोत्सव मंडळात तरुणांची संख्या जास्त असल्याने जमलेल्या तरुणांना नोकरीविषयक मार्गदर्शनही केले. आर्मी, पोलीस भरती, स्पर्धा परिक्षामध्ये तरुणांनी उतरावे, आर्मी आणि पोलीस भरतीसाठी मैदानाबाबत माहिती घेतली आणि त्यांच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील कार्यकाळामध्ये त्यांना आलेले आणि तरुणांना प्रोत्साहन मिळेल असे अनुभव सांगितले. पोलीस, आर्मी भरती आणि स्पर्धा परीक्षेसाठी कोणत्याही तरुणांना अडचण आल्यासभेट मला केव्हाही भेटा, मी आपणास मार्गदर्शन करतो असेही यावेळी त्यांनी सांगितले. एकंदर शांतता बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी स.पो.फौ. श्री. कैलास मारकड, पो.हे.कॉ. श्री. हरिश्चंद्र पाटील, पो.कॉ. सरपंच श्री.सतीश उबाळे, उपसरपंच प्रतिनिधी जुम्मा पठान, पोलीस पाटील हनुमंत चांदणे, विनायक सातव, बालाजी चौधरी, अविनाश कांबळे, बालाजी मदने, आकाश जाधव, अक्षय जगताप, गणेश लोंढे, गणेश खारे, अजित यादव, अरुण भोईटे यांसह ग्रामस्त उपस्थित होते.