सोलापूर, दिनांक 16(जिमाका):-भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांना माहिती देण्याबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, आदर्श आचारसंहितेचे पालन करणे राजकीय पक्षांनाही अनिवार्य आहे. त्यामुळे निवडणूक प्रचार करत असताना संबंधित विभागांच्या सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊनच प्रचार करावा. लोकसभा निवडणूक कालावधीत ज्या पद्धतीने जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहिता पालन केले त्याप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही करावे, असे त्यांनी आवाहन केले.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेले निवडणूक कार्यक्रमा नुसार दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी अधिसूचना प्रसिद्ध होऊन 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक असणार आहे. अर्जाची छाननी 30 ऑक्टोबर रोजी तर अर्ज मागे घेण्याची तारीख 4 नोव्हेंबर 2024 अशी आहे. मतदानाची तारीख 20 नोव्हेंबर 2024 असून मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबर 2024 रोजी होईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी देऊन आचारसंहिता कालावधीत सर्व राजकीय पक्षांनी काय करावे व काय करू नये याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघ असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारासाठी विविध परवानग्या राजकीय पक्षांना घेण्यासाठी एक खिडकी योजना सुरू राहणार असून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात ही एक खिडकी योजना आहे. राजकीय पक्षांनी विहित ठिकाणी विहित मुदतीत सर्व प्रकारच्या परवानगी घेऊनच प्रचार सभा, निवडणूक मिरवणुका घ्याव्यात. आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्वसामान्यांनी तक्रारी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे, त्याप्रमाणेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ही तक्रार निवारण कक्ष संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्थापित केलेले आहेत, अशी माहिती श्रीमती कुंभार यांनी दिली.
सर्व पक्ष्यांनी उमेदवारांनी मतदाराला लाच देणे, त्यांना धाकटपशा दाखवणे, मतदाराबाबत तोतयागिरी करणे, मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आत प्रचार करणे, मतदान संपण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेस संपणाऱ्या 48 तासांच्या मुदतीत सार्वजनिक सभा घेणे आणि मतदान केंद्रापासून मतदारांची ने आण करणे यासारखे निवडणूक कायद्याने गैर ठरणारे प्रकार व अपराध करू नयेत. तसेच वेगवेगळ्या जाती जमाती भिन्न धर्मी किंवा मित्र भाषिक यांच्यामध्ये असलेले मतभेद वाढतील किंवा जातीय वैमनस्य निर्माण होईल अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभाग घेऊ नये. सभा व मिरवणुकीबाबतचे नियम पाळावेत. तसेच सर्व राजकीय पक्ष सत्ताधारी पक्ष उमेदवार यांनी आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आदर्श आचार संहिता कक्ष नोडल अधिकारी मनीषा कुंभार यांनी केले. तसेच आचारसंहिता तत्वांचे सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.