ताज्या बातम्यामाढा-करमाळासोलापूर जिल्हा
दोन लक्झरी बसच्यामध्ये टेम्पोचा चुराडा. तब्बल ३ तास ट्रॅफिक जॅम.
दीड तासांनी पोलिस घटनास्थळी हजर, स्थानिकांनी केले ट्रॅफिक पोलिसांचे काम.

म्हैसगाव दि. १३: कुर्डुवाडी बार्शी रोडवर दोन लक्झरी आणि एका टेम्पोचा भीषण अपघात झाला असून दोन लक्झरी बसच्या मध्ये टेम्पोचा चुराडा झाला. हा अपघात मामाश्री हॉटेल जवळ सायंकाळी ५:२० च्या सुमारास घडला.
अपघातग्रस्त टेम्पो एम एच.०४ एल.क्यू ३२७३ कुर्डुवाडीच्या दिशेने जात होता. टेम्पोच्या पुढे असलेल्या लक्झरी बस चालकाने अचानक ब्रेक लावल्याने लक्झरी बस जाग्यावर थांबली आणि टेम्पोची लक्झरीला पाठीमागून ठोकर बसली इतक्यात टेम्पोच्या पाठीमागे असलेली लक्झरी बस क्रमांक एम.एच.१४ एच.जी.६००८ ने टेम्पोला पाठीमागून ठोकर दिल्याने दोन्ही लक्झरी बसच्यामध्ये टेम्पोच्या केबिनचा चुराडा झाला.
यातील पुढे असलेल्या लक्झरी चालकाने मागील लक्झरी क्रमांक एम.एच.१४ एच.जी.६००८ च्या चालकास मारहाण करून घटनास्थळावरून पोबारा केल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.
टेम्पोच्या केबिनमध्ये चालकासह एक पुरुष व एक महिला होती. स्थानिकांनी टॉमीच्या सहाय्याने दरवाजा तोडून तिघांना बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असून जखमींची पुढील माहिती मिळू शकली नाही.
घटना घडल्यानंतर लक्झरी बस एम.एच.१४ एच.जी.६००८ च्या चालकाने पोलिस स्टेशनला फोन करून माहिती दिल्याचे सांगितले. मात्र पोलिसाना घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल दिड तास लागला. ५:३० वाजल्यापासून ७ वाजेपर्यंत म्हैसगाव, चिंचगाव येथील नागरिक आणि काही प्रवाशांनी वाहतूक सुरुळीत करण्याचा प्रयत्न केला. परंतु ४-५ किलोमीटरच्या वाहनांच्या ४ रांगा लागल्याने वाहतूक सुरुळीत करणे जिकिरीचे ठरत होते.
पोलिस घटनास्थळी येईपर्यंत तब्बल दिड तास हर्षवर्धन पाटील म्हैसगाव , अविनाश करळे नालगाव, स्थानिक नागरिक आणि ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या काही तरुणांनी मिळून वाहनांचा रस्ता मोकळा करण्यास मदत केली.