जनसंवाद-कुर्डुवाडी/सोलापूर दि.२६ : माढा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध व बनावट मद्य विक्री केली जात असल्याची तक्रार राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक कार्यालय सोलापूर यांचेकडे करण्यात आली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने दुय्यम निरीक्षक कुर्डुवाडी कार्यालयाने अवैध ताडी, हातभट्टी निर्मिती आणि अंजनगाव खे येथील एका ढाबा चालकावर कारवाई केल्याचा अहवाल अधिक्षक कार्यालयास सादर केला आहे. ज्या ठिकाणी कारवाई केली त्या ठिकाणी भविष्यात अवैध दारू विक्री होत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर पुन्हा कारवाई करणार असल्याचे अर्जदारास कळविण्यात आले.
माढा तालुक्यात २० जानेवारी पासून १८ मार्च पर्यंत फक्त तीन – चार ठिकाणी अवैध मध्य विक्री सुरू असल्याचे आढळून आल्याचा अहवाल दिल्याने तालुक्यात सर्वत्रच पाचशे ते हजार मीटर अंतरावर राजरोसपणे खुलेआम सुरू असलेले शेकडो अवैध धंदे पाहता दुय्यम निरीक्षकांनी दिलेला अहवाल वस्तुनिष्ठ आहे का? कारवाई केलेल्याच व्यावसायिकांवर पुन्हा कारवाई करणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. याचा अर्थ इतर अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणारच नाही का? याबाबत उलटसुलट चर्चेला सुरुवात झाल्यास नवल वाटू नये.
बनावट मद्य निर्मिती आणि विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी जनसंवाद न्यूज प्रयत्नशील आहे. तालुक्यात अवैध मद्य विक्री आढळून आल्यास नागरिकांनी info.jansanvad@gmail.com या मेलवर अवैध, बनावट मद्य निर्मिती, विक्री होत असल्याचे लोकेशनसह फोटो, व्हिडिओ अथवा अन्य माहिती पाठवावी. मिळालेल्या माहितीची पुष्टी झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात येईल. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.