जनसंवाद न्युज नेटवर्क, दि.८ : करमाळा विधानसभा (Karmala Constituency) निवडणुकीत प्रत्येकवेळी किंग मेकर (King Maker) या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नागेश कांबळे (Nagesh Kamble) यांनी अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे (Sanjay Mama Shinde) यांना आज जाहीर पाठिंबा दिला. संजयमामा शिंदे यांना निवडून देऊन आम्हीच किंग मेकर बनणार असल्याचा दावा यावेळी नागेश कांबळे यांनी केला.
अनेक वेळा घुमरे सरांनी तर २०१९ मध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप (Jaywantrao Jagtap) यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघात किंग मेकर म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यावेळी नागेश कांबळे किंग मेकर बनणार असून संजयमामा शिंदे यांना निवडून आणण्यासाठी तालुक्यातील दलीत समाजाच्या माध्यमातून बहुमत मिळवून देणार असल्याचे नागेश कांबळे यांनी बोलताना सांगितले.
करमाळा-माढा मतदार संघातून यंदा अतिशय चुरशीची लढत होत असून मागासवर्गीय समाजाने संविधानाच्या मुद्द्यावर भाजपला विरोध करत महाविकास आघाडीला मतदान केले. परंतु नंतर महाविकास आघाडीचे सुप्रीम नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केले. सोलापूर जिल्ह्यात व महाराष्ट्रात मागासवर्गीय राखीव जागांवर आयात करून उमेदवार दिले. चळवळीतील स्थानिक कार्यकर्त्यांचा विचार केला नाही याचाच रोष म्हणून करमाळा तालुक्यात आपण एक प्रयोग करत असून महाविकास आघाडी व महायुती या दोन्हींना अद्दल घडवण्यासाठी त्यांना मतदान न करता अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांना मतदान करून ताकद दाखविणार असल्याचे नागेशदादा कांबळे यांनी सांगितले.
नागेशदादा कांबळे हे बहुजनवादी चळवळीतील मोठे नाव असून त्यांना मानणारा मोठा वर्ग या तालुक्यात आहे. नागेशदादा कांबळे यांच्या भूमिकेमुळे आधीच चुरशीची होत असलेली ही निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे.
करमाळा तालुक्यात एकूण २५ ते २८ हजार मागासवर्गीय मतदार असून त्यापैकी किमान दहा हजार मतदार चळवळीच्या माध्यमातून जोडले गेलेले आहे. हे दहा हजार मतदारच करमाळा तालुक्याचा आमदार ठरवण्यासाठी निर्णायक ठरणार आहेत. सगळे मोठे नेते महाविकास आघाडीकडे जात असताना आपले स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याची व किंगमेकर बनण्याची संधी असून अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना विजयी करून दलित समाज किंगमेकर बनणार आहे असे नागेश कांबळे यांनी पुढे बोलताना सांगितले.
यावेळी बोलताना संजयमामा शिंदे म्हणाले की, नागेशदादा कांबळे हे अतिशय तात्विक राजकारण व समाजकारण करतात. मला अशाच लोकांची गरज आहे. नागेशदादा कांबळे यांच्या चळवळीच्या कामात माझा कसलाही हस्तक्षेप होणार नसून त्यांच्यामुळे या उमेदवारीस अधिक बळ मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
दलित सेना, मातंग एकता आंदोलन, वैदू समाज, ख्रिश्चन समाज यांचे वतीने संजयमामा शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला.
यावेळी विवेक येवले, लक्ष्मणराव भोसले, कन्हैयालाल देवी, हर्षल बागल यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन भिमराव कांबळे सर यांनी केले.