गुन्हेगारीताज्या बातम्यामाढा-करमाळासोलापूर जिल्हा
मुलींची छेड काढाल तर कारवाई अटळ, निर्भया पथकाची मातोश्री प्रशालेला भेट आणि विद्यार्थ्यांचे प्रबोधन.

म्हैसगाव/सोलापूर दि.२५ : म्हैसगाव येथील मातोश्री माध्यमिक विद्यालयाला निर्भया पथकाने आज भेट दिली. पालकांच्या वाढत्या तक्रारी पाहता विद्यालयाने निर्भया पथकास संपर्क केला होता. इयत्ता आठवी ते दहावीच्या मुलांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या कालावधीत शाळेभोवती आणि रस्त्याने फेऱ्या मारणाऱ्या टपोरीगिरी करणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकांमध्ये अनामिक भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे मुलींच्या संरक्षणाच्या दृष्टीने योग्य पावले उचलण्याची विनंती केली होती. शाळा व्यवस्थापनाने पोलिस उप अधिक्षक करमाळा यांना माहिती दिल्यानंतर निर्भया पथकाने आज विद्यालयास भेट दिली.
इयत्ता आठवी ते दहावीच्या मुलींना महिला पोलिस विद्या इंगोले यांनी समुपदेशन केले. घरातून बाहेर पडल्यापासून शाळेतून घरी जाईपर्यंत येणाऱ्या प्रत्येक समस्येला कसे सामोरे जायचे याची माहिती विद्यार्थिनींना दिली.
संभाजी पवार, समीर खैरे आदींनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. यावेळी करमाळा पोलिस उपअधिक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी पवार, समीर खैरे, गणेश गुटाळ, महिला पोलिस विद्या इंगोले पथकात सहभागी होते. त्याचसोबत मातोश्री माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, अध्यापक, कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.
निर्भया पथकातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तत्परतेची दखल घेत शाळा आणि पालकांच्या वतीने निर्भया पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.