लक्षात आणून दिल्यावर बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना उशिरा सुचलेले शहाणपण… – Jansanvad
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीयसोलापूर जिल्हा

लक्षात आणून दिल्यावर बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना उशिरा सुचलेले शहाणपण…

कुर्डूवाडी दि.१८ : सार्वजनिक बांधकाम उपविभातील अधिकाऱ्यांना महा पुरुषांच्या जयंतीच्या विसर पडल्याने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती या कार्यालयात साजरी करण्यात आली नव्हती. त्याच सोबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अधिकारी उपस्थित नसल्यामुळे कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने साजरी केली होती. याची आज कार्यालय प्रमुख एस. डी. हेळकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर आज दि.१८ एप्रिल रोजी साडे चार वाजनेच्या दरम्यान जयंती साजरी करण्यात आल्याची घटना घडली.

सविस्तर वृत्त असे की, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, १ मे हे राष्ट्रीय उत्सव सर्व शासकीय कार्यालयातून साजरे करण्यासोबतच देशासाठी, समाजासाठी विशेष योगदान असलेल्या महापुरुषांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते. ११ एप्रिल रोजी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती होती. सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुर्डूवाडी येथे महात्मा फुले यांची जयंती साजरी केली गेली नव्हती.

महात्मा फुले जयंती नंतर अवघ्या तीन दिवसांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती. आंबेडकर जयंती रविवारी असल्याने हक्काच्या सुट्टीच्या दिवसाचा आनंद जयंती मुळे हिरावला जाऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी १४ एप्रिल रोजी कार्यालयाकडे पाठ फिरवली. अधिकारी कार्यालयात येत नसल्याचे पाहून येथील सफाई कर्मचारी बाळासाहेब जगताप यांनी कुर्डूवाडी शहरातील एका नागरिकास सोबत घेऊन बांधकाम विभागाच्या कार्यालयात जयंती साजरी केली होती.

गुरुवार दि.१८ रोजी उप विभागीय अभियंता श्री.एस.डी हेळकर यांचेकडे याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला तद्नंतर तात्काळ हार तुरेची व्यवस्था करून जयंती साजरी करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते. 

महा पुरुषांचा विसर पडलेल्या अधिकाऱ्यांविरोधात जनमानसात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसून येतात. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशभरात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने आंदोलन, निदर्शने करता येणार नसली तरी वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे अनेक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी जनसंवादशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

०००

बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क:

9527271389

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button