जनसंवाद/कुर्डूवाडी दि.८: के. एन. भिसे आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, विद्यानगर भोसरे या ठिकाणी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या उद्योजकता या विषयावर शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेचे अध्यक्षस्थान माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई भिसे यांनी भूषविले. परिषदेसाठी उद्घाटक म्हणून माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ॲड. सौ. मीनल ताई साठे लाभल्या होत्या.
आपल्या मार्गदर्शनामध्ये ॲड. मीनल ताई साठे यांनी माढा तालुका आणि परिसरामध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून होत असणाऱ्या आर्थिक उलाढालीचा आढावा घेतला. संस्थेच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई भिसे यांनी कुर्डूवाडी मध्ये देखील अशाच प्रकारच्या बचत गटांच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक उलाढालीचा आढावा घेवून महिलांनी सावित्रीची लेक नव्हे तर सावित्री होण्याचे आव्हान अध्यक्षीय मनोगतात केले.
प्राचार्या डॉ. अनुपमा पोळ यांनी सर्व उपस्थितांना बुके देऊन सत्कार केला आणि मार्गदर्शन केले. दिवसभर चाललेल्या या सत्रांमध्ये डॉ. अस्मिता बाळगावकर यांनी मीच माझी शिल्पकार, श्री. अवधूत देशमुख, सलोनी झगडे यांनी उमेदीच्या सहाय्याने माढा तालुक्यात बचत गटांच्या माध्यमातून होत असणाऱ्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा आढावा घेतला.
डॉ. भाग्यश्री वटवे यांनी महिलांनी केवळ कुटीर उद्योगावरती समाधान न मानता लघु व मध्यम उद्योगाकडे देखील वळले पाहिजे अशा प्रकारचे आवाहन केले. दुपारच्या सत्रामध्ये महाविद्यालयामध्ये माढा तालुक्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनाच्या विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. सायंकाळच्या सत्रामध्ये पेपर वाचनाचे सत्र संपन्न झाले.
या परिषदेचा समारोप संस्थेच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई भिसे, संचालिका सौ. राजश्रीताई भिसे, सौ. मदने ताई, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुपमा पोळ, उपप्राचार्य डॅा. पी. एस. कांबळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. उपप्राचार्य डॅा. पी.एस.कांबळे यांनी परिषदेच्या अहवालाचे वाचन केले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. संतोष भिसे, सचिव श्री. शामसुंदर भिसे, डॅा. संगिता पैकेकरी, सिनेट सदस्य डॅा. सिमा गायकवाड, डॅा. सुनिता कांबळे, डॅा वशोभा खंदारे, डॅा. वंदना गवळी, डॅा. सुधा बनसोडे, डॅा. विजया गायकवाड, महाविद्यालयातील परिषदेसाठी तयार केलेल्या विविध कमिट्यांचे चेअरमन व सदस्य, शिक्षकेतर सहकारी, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संलग्नित विविध महाविद्यालयातील प्राध्यापक या राष्ट्रीय परिषदेला उपस्थित होते.