माढा-करमाळारणसंग्रामराजकीयसोलापूर जिल्हा
विकासकाम करताना कधीही राजकारण केले नाही आणि करणारही नाही – संजयमामा शिंदे
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असल्यापासून करमाळ्याला दिला भरीव निधी
जनसंवाद न्युज नेटवर्क: कुर्डूवाडी दि. १६ -विकास ही चिरंतन आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये गेल्या पाच वर्षात मी माझ्या परीने योगदान दिले. सर्वच विकासकामे पूर्ण झाली असे नाही. परंतु जो काळ मला मिळाला, त्या काळामध्ये पायाभूत विकास करण्याचे काम मी केले असून इथून पुढच्या काळामध्ये तालुक्याला औद्योगिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ओळख निर्माण करून तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणे, हे आपले उद्दिष्ट असल्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी दरम्यान पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. शिंदे म्हणाले की, २०१९ ते २०२४ दरम्यान केलेल्या विकासकामांमुळे मतदारांचा माझ्यावर विश्वास बसला आहे. नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला अशी स्थिती असून ही निवडणूक जनतेने – हातात घेतली आहे. मी यंदाच्या टर्ममध्ये करमाळा शहराच्या – हद्दवाढीसह नवीन विकास आराखडा, शेती, वीज, आरोग्य आणि शिक्षण या प्रमुख कामाच्या बाबतीत प्राधान्य देणार आहे. करमाळा तालुक्यातील केळीखालील पीक क्षेत्रात होत असलेली वाढ लक्षात घेऊन येथे केळी संशोधन केंद्र होणे गरजेचे आहे, हा प्रश्न मी विधिमंडळात उपस्थित केलेला आहे. याशिवाय येथे एक कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
जाहीरनाम्यात करमाळा शहराच्या हद्दवाढीसह नवीन विकास आराखडा, शेती, वीज, आरोग्य व शिक्षण या घटकांवर भर दिला आहे. करमाळ्यात केळी संशोधन केंद्र सुरू करणे व कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा मानस आमदार शिंदे यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असल्यापासून मी करमाळ्याला निधी देतो आहे. विकासकाम करताना कधीही राजकारण केले नाही आणि करणारही नाही. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी काम केले आहे. काम करताना कधी दुजाभाव केला नाही.
उजनी धरणाच्या बॅकवॉटरच्या माध्यमातून मिळणारी सिंचन सुविधा लाभलेली आहे. नव्याने कुकडी-उजनी योजना सुरू करण्याचे आपले प्रयत्न असणार आहेत की, ज्यामुळे तालुक्यातील ४० गावांतील २४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. दहिगाव उपसा सिंचन योजनेचे काम बंद नलिकेतून होत आहे. त्यामुळे बचत होणाऱ्या पाण्यातून नव्याने समाविष्ट होणाऱ्या १२ गावांचा सऱ्व्हे करून बंद नलिकेतून पाणी देण्यावर आपण लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाड्याला पाणी जाणाऱ्या बोगद्याच्या ९ शिफ्टद्वारे पाणी उचलण्याची परवानगी मिळवण्यावर आपण भर देणार असून सीना माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी बेंद ओढ्यात सोडले जाणार आहे, ज्या ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम झाले आहे. मांगी एमआयडीसी येथे पाणीपुरवठा योजना सुरू करून तेथे नामांकित कंपन्या आणून रोजगार निर्मिती करणे गरजेचे आहे. याशिवाय बेरोजगारीचा प्रश्न सुटणारच नाही असे सांगितले.
०००