ताज्या बातम्यामाढा-करमाळासोलापूर जिल्हा
PWD कुर्डूवाडी: निकृष्ट रस्ता, अपूर्ण काम, अनेक तक्रारी तरीही कार्यवाही नसल्याने गावकऱ्यांसह सरपंचावर आमरण उपोषण करण्याची वेळ.
जनसंवाद/कुर्डूवाडी, दि.२४ : म्हैसगाव (ता.माढा) ते लहू या रस्त्याचे काम अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुर्डूवाडी येथे अनेक तक्रारी देऊनही सदरील कामाची तपासणी न करता ठेकेदाराची देयके अदा करण्यात आल्याने म्हैसगावचे सरपंच श्री.सतीश उबाळे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुर्डूवाडी येथील कार्यालयात ग्रामस्थांसोबत आमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, म्हैसगाव ते लहू ६ किलोमिटर रस्ता निकृष्ठ दर्जाचा झाला असल्याने तसेच या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने सरपंच सतीश उबाळे यांनी वारंवार लेखी तक्रार दिलेली आहे. कामाची तपासणी झाल्याशिवाय आणि अपूर्ण असलेले काम पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदाराची देयके देऊ नयेत अशी लेखी तक्रार असताना ठेकेदारास देयके अदा करण्यात आली असल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाई करून गुन्हे दाखल करून ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून कार्पेट मातीवर टाकण्यात आले आहे. माती मिश्रित मुरुमाचा वापर केल्याने पावसाळ्यामध्ये कार्पेट खालून पाणी वाहत असल्याचे आढळून आलेले आहे. जुलै २०२३ मध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुर्डूवाडीचे उपविभागीय अभियंता श्री. हेळकर यांनी कामाची पाहणी केली होती. त्यावेळी पाऊस सुरू झाल्याने कार्पेट खालून पाणी वाहत असल्याचे उप विभागीय अभियंता यांनी समक्ष पाहिलेले होते. तरीही एकाही आर्जवर अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याने अधिकारी आणि ठेकेदार यांचे लागेबांधे असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे उपोषणकर्त्यानी जनसंवादशी बोलताना सांगितले.
व्हिडिओ पाहा: संपूर्ण रस्त्यासह तत्कालीन अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात.
पूर्ण रस्त्याची तपासणी करण्यात यावी. दोषी ठेकेदारावर कारवाई करून ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे. ठेकेदारास पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांची कार्यालयीन चौकशी करण्यात यावी या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज पहिला दिवस आहे.