राज्यात २७-२८ डिसेंबरदरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज; कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस? जाणून घ्या. – Jansanvad
ताज्या बातम्या

राज्यात २७-२८ डिसेंबरदरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज; कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस? जाणून घ्या.

मुंबई, दि. 25 : 27-28 डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

 

27 डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये होईल. शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल, ज्यात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे.

 

28 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. यात यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे. या दिवशी एकंदरीत विदर्भात आणि मराठवाड्यात आभाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल.

 

29 डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाण वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान पहिला मिळेल, आणि 30 डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल.

 

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. प्राण्यांना आणि काढणी केलेल्या पिकांना पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button