ताज्या बातम्यामहाराष्ट्रसोलापूर जिल्हा
Trending

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान : शासकीय यंत्रणेला पूर्वसूचना दिल्याशिवाय अशासकीय संस्थांनी कामे सुरू करू नयेत -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

या अभियानांतर्गत जिल्ह्यात पूर्ण झालेल्या 81 कामांमधून 'इतके' लक्ष घनमीटर गाळ काढण्यात येऊन किती टीएमसी पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आणि याचा किती शेतकऱ्यांना लाभ झाला?... वाचा सविस्तर

सोलापूर, दिनांक 16 जिमाका:- जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील 252 कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अशासकीय संस्थाकडून कामे सुरू आहेत, परंतु काही अशासकीय संस्था संबंधित शासकीय यंत्रणेला कोणतीही पूर्वसूचना न देता कामे सुरू करत आहेत. ही बाब अत्यंत चुकीची असून अशासकीय संस्थांनी या पुढील कामे कोणतीही पूर्व सूचना न देता सुरू करू नयेत अन्यथा अशा संस्थांना काळ्या यादीत टाकले जाईल याची नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

          नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, प्रांताधिकरी विठ्ठल उदमले, प्रांताधिकारी सदाशिव पडदूने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, वरिष्ठ भू वैज्ञानिक श्री. शेख यांच्यासह सर्व समिती सदस्य व अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

          जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की अशासकीय संस्थांना गाळमुक्त धरण अंतर्गत कामे करत असताना शासकीय यंत्रणांकडून सहकार्य करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने अशासकीय संस्थांनी ही शासनाने घालून दिलेल्या विहित अटी व शर्तीनुसार कामे केली पाहिजे. अशासकीय संस्थांच्या ज्या काही अडचणी येथे मांडण्यात आलेल्या आहेत त्या नक्कीच सोडवण्यात येतील, परंतु या संस्थांनी गाळ काढण्याचे कोणतेही काम सुरू करत असताना संबंधित शासकीय यंत्रणेला पूर्वकल्पना द्यावी. तसेच काम पूर्ण झाल्यानंतरही त्याविषयी सविस्तर माहिती द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

           अशासकीय संस्थांनी गाळ काढत असताना तो गाळ कोणत्या शेतकऱ्यांच्या शेतावर टाकला जात आहे त्या संबंधित शेतकऱ्यांच्या नावांची यादी तयार करावी. संबंधित शासकीय यंत्रणा कामावर भेट व पाहण्यासाठी आल्यावर त्या शेतकऱ्यांची यादी यंत्रणेला उपलब्ध करून द्यावी. त्याप्रमाणेच जलसंधारण विभागाने या सर्व कामांची माहिती रोजच्या रोज अद्यावत करण्यासाठी अवनी ॲप उपलब्ध करून दिलेले आहे. त्यावर संपूर्ण अद्यावत माहिती व्यवस्थितपणे भरावी. ही माहिती भरत असताना काही अडचण येत असतील तर त्या अनुषंगाने सर्व शासकीय संस्थांच्या तांत्रिक व्यक्तींचे प्रशिक्षण लवकरच आयोजित करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

           या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 252 कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली होती त्यातील 81 कामे पूर्ण झालेली आहेत. सद्यस्थितीत 27 कामे सुरू आहेत तर 79 कामे सुरू झालेली नाहीत. जी कामे सुरू झाली नाहीत ती कामे आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ सुरू करावीत. तसेच मंजूर कामातून 65 कामे रद्द करण्याची शिफारस संबंधित यंत्रणांनी केलेली आहे. ती कामे का रद्द करावीत याचा अहवाल कारणासह तात्काळ संबंधित यंत्रणांनी प्रशासनाला सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

यावेळी जलयुक्त शिवार अभियान 2.0 चा ही आढावा घेऊन संबंधित यंत्रणांनी कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आले.

          प्रारंभी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. दामा यांनी जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत 252 कामामधून 81 कामे पूर्ण झालेली आहेत. या 81 कामापैकी 52 कामे सन 2023 मध्ये पूर्ण होऊन त्यातून 21.33 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आलेला असून तो अंदाजे 600 हेक्टर क्षेत्रावर टाकलेला आहे त्याचप्रमाणे सन 2024 मध्ये 29 कामांमधून 20.61 लक्ष घनमीटर काढून तो अंदाजे 550 हेक्टर क्षेत्रावर पसरवलेला आहे यातून जवळपास 1 हजार 600 शेतकऱ्यांना लाभ झालेला असून एकूण 0.148 टीएमसी पाणी साठवण क्षमता निर्माण झालेली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे सद्यस्थितीमध्ये 27 जलसाठ्यामधून गाळ काढण्याचे काम सुरू असून त्यातून आत्तापर्यंत 11.61 लक्ष घनमीटर गाळ काढलेला आहे. जी 79 कामे सुरू झालेले नाहीत त्यातील 15 कामे जलसंपदा विभाग 51 कामे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग व 13 कामे मृद व जलसंधारण विभागाची असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button