गुन्हेगारीताज्या बातम्यामाढा-करमाळासोलापूरसोलापूर जिल्हा
संततधार, अतिवृष्टी निधी : उत्तर सोलापूरमध्ये सुमारे ६ लाखाचा घोळ उघडकीस, माढा तालुक्यात किती?

जनसंवाद/माढा दि.१५ : संततधार व अतिवृष्टी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने थेट हस्तांतरण केलेली रक्कम परत करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली. उत्तर सोलापूर तालुक्यातील २७ शेतकऱ्यांना ५ लाख ७१ हजार ५०४ रुपये जमा करण्याचे नोटीस तहसीलदार यांनी काढले असल्याची बातमी नुकतीच दै.लोकमतने प्रसिद्ध केली.
मागील वर्षी शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व संततधार पावसाने नुकसान झाले होते. शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत म्हणून काही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली होती. ही रक्कम मिळण्यासाठी तहसील पातळीवरून मंजुरी देण्यात आली होती. मंजूर यादीतील शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतो.
२४ जुलै रोजी माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लाभ घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांची नावे भिन्न विशिष्ठ क्रमांकाने दुसऱ्या यादीत असल्याचे आढळून आले होते.
ही बाब माढा तालुक्यात तहसील कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. दोन्ही यादीत नाव असले तरी एका शेतकऱ्याला दोन वेळा लाभ मिळणार नाही असे येथील एका जबाबदार कर्मचाऱ्याने जनसंवादशी बोलताना सांगितले होते. विशिष्ट क्रमांक भिन्न असल्याने दोन वेळा आधार प्रमाणीकरण करणे शक्य असताना दोनदा लाभ मिळणार नाही असे सांगणे न पटणारे होते.
उत्तर सोलापूर तालुक्यातील घटना उघडकीस आल्याने माढा तालुक्यातील व्याप्ती किती हा प्रश्न निर्माण झाला आहे. कल्पना दिलेली असताना गांभीर्याने दखल न घेतल्याने ठराविक तलाठी, कारकून यांनी संपर्कातील व्यक्तीच्या माध्यमातून संगनमताने शासनाची फसवणूक केली असल्याचे नाकारता येत नाही.
यापूर्वीही माढा तालुक्यातील ३-४ गावामधील एका शेतकऱ्याच्या नावे मंजूर झालेला निधी दुसऱ्या व्यक्तीने आधार प्रमाणीकरण काढून घेतल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्याच्या नावापुढे दुसऱ्या व्यक्तीचा आधार नंबर जोडून शेतकऱ्याच्या परस्पर लाखोंचा निधी संगनमताने हडप झाला असल्याची शंका नाकारता येत नाही. मागील २ वर्षातील वितरित निधीची चौकशी करण्यात यावी असा सूर वंचित शेतकऱ्यांतून निघत आहे.
क्रमशः