जनसंवाद/कुर्डूवाडी दि.३०: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सोलापूर जिल्ह्यात बारा वेळा आले होते . गौतम बुद्ध व डॉक्टर आंबेडकर यांचे विचार सोलापूर जिल्ह्यात चांगल्यापैकी रुजलेले आहेत हे या धम्मपरिषदे वरून दिसून येते आहे . त्यामुळे भविष्यात सोलापूर जिल्हा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे केंद्र होवो असे गौरव उद्गार डॉक्टर आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी काढले .
कुर्डूवाडी येथे माढा तालुक्यातील पहिल्याच धम्म परिषदेचे आयोजन भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षते खाली आनंदाच्या वातावरणात रेल्वे कॉलनी येथे संपन्न झाले . याप्रसंगी विचारवंत प्रा सुकुमार कांबळे बौद्ध धर्मातील अनेक बौद्ध भिकू सह मान्यवर उपस्थित होते . याप्रसंगी बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सामूहिकरीत्या बौद्ध धर्मात सामील होण्याची शपथ सर्वांना बौद्ध भिक्कू यांनी दिली . भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते प्रथम ध्वजवंदना करण्यात आली यावेळी त्यांना समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली .
याप्रसंगी भीमराव आंबेडकर म्हणाले समतावादी असलेल्या बौद्ध धर्माचे पुनर्जीवन बाबासाहेबांनी केले हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून बहुजनांना मुक्त करण्यासाठी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी बाबासाहेबांनी आयुष्य वेचले . बुद्धाचा धम्म म्हणजे मानवाच्या सुखाचा शोध घेणारा धर्म आहे . बुद्धांनी पंचशील तत्वे अष्टांग मार्ग हे जीवन सुखी करण्यासाठी बनवले आहेत . बुद्धम् शरणम् गच्छामि म्हणजे बुद्धीला जे पटेल तेच स्वीकारा हा अर्थ होतो आहे . बौद्ध धर्माचे अनुसरण केले तर त्याची प्रगती होते अन्यथा होणार नाही म्हणाले .
भविष्यात भारत हिंदू राष्ट्र करण्याच्या काही जन वल्गना करत आहेत हे कधीच होणार नाही भविष्यात भारत पूर्वीसारखा धम्ममय होईल परंतु हिंदू राष्ट्र होणार नाही म्हणाले . सम्राट अशोक यांनी 84 हजार बुद्ध विहार देशात बांधले यातीलच एक महत्त्वाच्या महाबोधी बुद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यासाठी देशभर आंदोलन आहे ते आंदोलन तीव्र करा म्हणाले . पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला आलेत तेथे त्यांना याबाबतचे निवेदन समाज बांधवांनी दिले आहे . तुमच्या समस्या सोडवण्यासाठी भविष्यात तुम्हालाच लढा द्यावा लागेल म्हणाले . बुद्ध पौर्णिमा जसी आपण साजरी करतो तसेच यापुढे 5 एप्रिलला सम्राट अशोकाची जयंती साजरी करण्याचे आवाहन त्यांनी समाज बांधवाला केले .
यावेळी प्राध्यापक सुकुमार कांबळे यांचे धम्म परिषदेला साजेशे भाषण झाले . या धम्म परिषदेसाठी परिश्रम प्रदीप सोनटक्के अमोल रजपूत अमरकुमार माने सह प्रा डॉ प्रकाश कांबळे, सुनील शिंदे, विवेक वाघमारे, दशरथ कांबळे, सुनील ओहळ, कालिदास जानराव, अशोक ओहोळ, संजय साळवे, रत्नपाल चव्हाण, आतिश कांबळे, भीमा माने, चिकू ताकपिरे, अनिल कापुरे, शाहू सोनवणे, सौदागर ताकतोडे, संदीप रिकीबे समाज बांधवांनी परिश्रम घेतले या धम्म परिषदेला माढा तालुक्यास इतर तालुक्यातून मोठी गर्दी झाली होती .
मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण
मुंबई येथे मुस्लिम समाजाने आयोजित केलेल्या रोजा इफ्तारच्या अनेक कार्यक्रमाला मी हजेरी लावली आहे. तेथे मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने बोलून दाखवले आहे की आमचा मुस्लिम समाज सध्या भीतीच्या वातावरणामध्ये जगत आहे. दलित बांधवांनी मुस्लिम समाजाला मदत करण्याचे आवाहन भीमराव आंबेडकर यांनी केले.