म्हैसगाव दि.१८ : म्हैसगाव येथील शाळेत जात असलेल्या प्रणव बालाजी सुरवसे या १४ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाला असून मृताच्या वडिलांचा एक महिन्यापूर्वी किडनीच्या आजाराने मृत्यू झाला होता. या अपघाताने सुरवसे कुटुंबियांवर एका महिन्यात काळाने दुसरा आघात केला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
दि. १८ मार्च रोजी सकाळी ०७:३० वा. प्रणव बालाजी सुरवसे, वय १४ वर्षे यास म्हैसगाव गावातील वसंतराव नाईक विद्यालयाजवळ एका ट्रॅक्टरने धडक दिल्याने जखमी झाला. तो म्हैसगाव येथील मातोश्री माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता.
मयत प्रणवचे चुलते बापू सुरवसे यांना अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी जाऊन त्यांनी तत्काळ कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु तत्पूर्वी प्रणव याचा मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले असल्याचे कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही फिर्याद अभिजीत तानाजी सुरवसे यांनी दिली आहे.
प्रणव हा सकाळी राहते घरून चालत शाळेत जात असताना हा अपघात झाला. तो सकाळी ७:३० चे सुमारास वसंतराव नाईक विद्यालयासमोरील रोडवरून मातोश्री विद्यालयात जात होता. म्हैसगावातील समाधान संपत वसेकर चालवीत असलेल्या ट्रॅक्टरची पाठीमागून धडक बसून त्याचे अंगावरून ट्रॅक्टरचे टायर गेल्याने प्रणव गंभीर जखमी झाला. उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कुर्डुवाडी येथे नेले असता उपचारापूर्वीच प्रणव मयत झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.
मागील महिन्यात १८ फेब्रुवारीच्या रात्री मयत प्रणवचे वडिल बालाजी सुरवसे यांचे किडनीच्या आजाराने निधन झाले होते. १ महिन्यातच सुरवसे कुटुंबावर नियतीने घाला घातला आणि एक आशेचा किरण, वंशाचा दिवा काळाने हिरावून घेतल्याने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.
मयत प्रणव यास दोन बहिणी असून एकीचे लग्न वडिलांच्या निधनापूर्वी आठ दिवस अगोदर झाले होते. तर दुसऱ्या बहिणीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. पतीच्या निधनानंतर मुलगा हेच विश्व असलेल्या आईवर मुलगा गमावण्याची वेळ आली. तर वडिलांच्या निधनानंतर भविष्यातील कुटुंबाचा आधार म्हणून ज्याच्याकडे पाहिले जात होते त्याच्यावरच काळाने घाला घातल्याने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.