खाकीतल्या जयचा नवीन धंदा – अवैध धंद्यांना खतपाणी, नवीन धंदे सुरू करणारांना भागीदारीची ऑफर  – Jansanvad
गुन्हेगारीताज्या बातम्यामाढा-करमाळासोलापूर जिल्हा

खाकीतल्या जयचा नवीन धंदा – अवैध धंद्यांना खतपाणी, नवीन धंदे सुरू करणारांना भागीदारीची ऑफर 

जनसंवाद/कुर्डूवाडी: कुर्डूवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हैसगाव बीटमधील अवैध व्यवसायावर लिहणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ओतल्याप्रमाणे आहे. कितीही अवैध व्यवसाय, हप्तेखोरी समोर आणले तरी सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी कार्यवाही होताना दिसून येत नाही.

 

कुर्डूवाडी-बार्शी रोड म्हणजे २४ तास वर्दळ, साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असल्याने स्थलांतरित कामगारांची वाढलेली संख्या. यामुळे किराणा दुकानांपासून ते हॉटेल, ढाबे आणि रोडलगत चालणाऱ्या अवैध व्यवसायांची उलाढाल अनेक पटींनी वाढलेली. या वाढलेल्या व्यवसायाचा फायदा घेण्यासाठी सर्वच व्यावसायिक पुढे सरसावलेले असतात.

 

कारखाना गळीत हंगामातील काही महिन्यातच अवैध व्यावसायिकांची वर्षभराची कमाई होत असते ही बाब आता लपून राहिलेली नाही. दारू, मटका आणि तत्सम अवैध व्यवसायिकांवर खाकीतील चाणाक्ष जय करडी नजर ठेऊन सावज हेरून हप्ता वाढवण्यासाठी कारवाईची धमकी देऊन खिसे गरम करून घेत आहे.

 

अल्पवयीन मुले, मुली बिनदिक्कतपणे अनेक लॉजवर वावरताना दिसून येतात. पोलिस यंत्रणा असताना व्यावसायिकांना खुलेआम नंगानाच करण्याचे धाडस कुठून येते? यंत्रणेचा वरवरून नाकर्तेपणा दिसत असला तरी आतून अर्थकारण असल्याचे बोलले जाते. हे कमी पडते म्हणून नवनवीन तरुणांना अवैध व्यवसायात येण्यासाठी कारवाई पासून मुक्ती देण्याच्या शब्दावर अवैध व्यवसायात ५० टक्के भागीदारीची मागणी केली जात असल्याची माहिती जनसंवादला मिळाली.

 

इतके नव्हे तर ज्यांनी अवैध व्यवसाय बंद केले आहेत त्यांना वेगवेगळ्या ऑफर देऊन पुन्हा अवैध धंदे सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे ही पोलिस प्रशासनाला मान खाली घालण्यास भाग पाडणारी बाब आहे. जय ला साथ देण्यासाठी खात्यातील वीरू कुर्डुवाडीततून सहकार्य करीत असून ही जोडगोळी म्हैसगाव बीटचा बिहार केल्याशिवाय शांत बसणार नाहीत असे दिसून येते.

 

अपघात किंवा अन्य बाबतीत पोलिस यंत्रणेला सहकार्य करणाऱ्या नागरिकांना गुन्ह्यात नाव ओवण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून लाचेची मागणी होत असल्याने भविष्यात पोलिस प्रशासनाला सर्वसामान्य नागरिक सहकार्य करण्याच्या मानसिकतेत दिसून येत नाही. बेवारस मयताच्या टाळूवरील लोणी खाण्यासाठी माहिती पुरविणाऱ्यालाच खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन हजारो रुपयांची मागणी करणारी यंत्रणा जनतेच्या कामाची आहे का? याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे.

 

गोपनीय माहिती पुरवणाऱ्या नागरिकांची नावे संबंधितांना पुरवून तुमच्या पातळीवर बंदोबस्त करण्याची परवानगी देऊन पोलिस प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या नागरिकांना अडचणीत आणले जात असल्याने नागरिक पोलिस प्रशासनाला सहकार्य करणार नाहीत त्यामुळे अनेक गुन्हे गुलदस्त्यातच राहणार आहेत.

 

माझ्यावर गुन्हा दाखल आहे. मी सेवेत किती दिवस असेल माहीत नाही त्यामुळे प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस समजून जितके छापता (कमवता) येईल तितके कमवून घेणे गरजेचे असल्याचे या कर्मचाऱ्याकडून विश्र्वासातील व्यक्तीकडे बोलले जात आहे. आता या कर्मचाऱ्यावर कसला गुन्हा दाखल आहे? गुन्हा दाखल आहे की, स्थानिकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे याची माहिती घेतल्याशिवाय लिहिणे सयुक्तिक ठरणार नाही.

 

कुर्डूवाडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या अवैध व्यवसायांवर धाडी टाकण्यात येत आहेत. नागरिकांना जाळ्यात ओढून लुटमार करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई चा बडगा उचलला जात आहे मात्र याच पोलिस ठाण्यातील काही कर्मचारी चिरीमिरीसाठी सबंध यंत्रणेची नाचक्की करताना दिसून येत आहेत.

 

कुर्डूवाडी पोलीस ठाण्यातील जय कोण आणि वीरू कोण हे वेळीच ओळखून त्यांच्यावर वेळीच पायबंद घातला गेल्यास पोलिस प्रशासनास सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास पुन्हा प्राप्त करता येईल.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button