ताज्या बातम्यामाढा-करमाळासोलापूर जिल्हा
संजय गांधी निराधार योजना: ६ महिन्यात दोनदा कागदपत्रांचा ससेमिरा, निराधार हैरान तर तलाठी आणि महा ई सेवा केंद्र चालक परेशान

जनसंवाद/माढा दि.१२ : माढा तालुक्यातील संजयगांधी, श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सहा महिन्यात दोनदा हयात असल्याचे सिद्ध करावे लागत आहे. तहसील कार्यालयाकडे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी कागदपत्र जमा करून सहा महिने होतात न होतात तोपर्यंत परत कागदपत्र जमा करण्याचा तहसील कार्यालयाकडून अघोषित फतवा निघाल्याने निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची असावस्था भिक नको पण कुत्र आवर अशी झाली आहे. तर दुसरीकडे कागदपत्र जमा करण्याची जबाबदारी असलेल्या तलाठी, कोतवाल आणि महा ई सेवा केंद्र चालकांची तारांबळ उडाली असल्याचे तालुक्यात चित्र आहे.
माढा तालुक्यातील संजयगांधी, श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना ऑफलाईन हयातीचे दाखले बंधनकारक केले होते. जून २०२४ मध्ये बँक मनेजरच्या सहीने प्रत्येक लाभार्थी जिवंत असल्याची खात्री करून हयातीचे दाखले देण्यात आले होते. अर्जासोबत आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड आणि मोबाईल नंबर देणे बंधनकारक होते. तालुक्यातील लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन कागदपत्र संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात जमा केले होते. एक कारकून आणि एक शिपाई यांनी कागदपत्र जमा करून घेतले होते.
कागदपत्र जमा करून सहा महिने उलटण्यापूर्वी परत एकदा कागदपत्रांची मागणी केल्याने तालुका प्रशासनाच्या कार्यशैलीवर लाभार्थी नाराज असल्याचे दिसून येते. ठराविक मुदतीत काम पूर्ण करावयाचे असल्याने तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील, महा ई सेवा केंद्र चालक व्हाटस्अप ग्रुपवर दररोज मेसेज फोरवर्ड करीत असल्याचे दिसून येते. सोलापूर जिल्ह्यात अशा प्रकारे कागदपत्र जमा करणारा माढा एकमेव तालुका असल्याचेही अधून आले आहे. इतर तालुक्यातून माहिती घेतली असता इतर तालुक्यात असा काही प्रकार नसल्याची माहिती मिळाली.
जून महिन्यात जमा केलेली कागदपत्र गहाळ झाली असावीत असा एक सूर निघत असून खात्री करण्यासाठी जनसंवादनेने तहसीलदार श्री.रणवरे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने अधिकृतपणे माहिती मिळू शकली नाही.
बँकेत चकरा मारून कसेबसे मिळवलेले कागदपत्र आणि तहसील कार्यालयात लागलेल्या रांगा, वृद्धांची झालेली गैरसोय, अपंगांवर आलेला ताण आणि तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्यासाठी भटकणारे वृद्ध पेन्शनधारक मात्र सततच्या कागदपत्रांच्या कटकटीला पुरते वैतागलेले दिसून येत आहेत.