ताज्या बातम्या

आम्ही पाठवतो तेच पहा, ऐका, वाचा. मतदारांनो… तुमचे मात्र काहीच सांगू नका; माढा तालुक्यातील गावागावात नेत्यांकडून व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातूनही मतदारांची मुस्कटदाबी सुरूच.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक नेत्यांचे गावोगावी व्हॉट्सअप ग्रुप, मतदारांना ग्रुपवर मेसेज करण्याची मुभाच नाही.

जनसंवाद: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक विद्यमान, भावी आमदारांनी व्हॉट्सअप ग्रुप बनवले आहेत. त्यांनी केलेली कामे, तालुक्याच्या (विशेषत: स्वतःच्या आणि चेलेचपाट्यांच्या) विकासासाठी शासनाकडून खेचून आणलेला निधी, मतदारसंघात केलेली कामे जनतेसमोर आणण्यासाठीच व्हॉट्सअप ग्रुपचा आधार घेतला जात आहे. ते फक्त निवडणुका तोंडावर आल्यावर. निवडून आल्यावर चार साडेचार वर्ष मात्र मतदारांची आठवण येणे दुरापास्तच.

आपण केलेली विकासकामे, विचार, भविष्यातील योजना/ नियोजन मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी गावोगावी असलेल्या कार्यकर्त्यांच्या आणि कामगारांच्या माध्यमातून जवळपास सर्वच नेत्यांनी व्हॉट्सअप ग्रुप बनवले आहेत. त्यापैकी बऱ्याच नेत्यांचे ग्रुप सर्वांना मेसेज करता यावेत यासाठी खुले ठेवण्यात आले आहेत मात्र काही मात्तब्बर नेत्यांच्या नावाने असलेल्या ग्रुपमध्ये मात्र फक्त ग्रुपचे मालकच मेसेज करू शकतात. त्यांनी जे मेसेज, व्हिडिओ, फोटो, जाहिरात टाकेल ते मतदारांनी गुमानं पहायचं. कुणाला काही आपत्ती असेल किंवा काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर एकही सदस्य त्या ग्रुपवर मेसेज करू शकत नाही. त्यामुळे अशा ठराविक नेत्यांच्या ग्रुपबद्दल तालुक्यात चर्चा रंगलेली दिसून येते.

विविध पदांवर कार्यरत असलेल्या नेत्यांच्या विरोधात तापत असलेले वातावरण शमविण्यासाठी तसेच नव्याने नशीब अजमावणाऱ्या नेत्यांचे, विद्यमान आमदारांचे गावागावात व्हॉट्सअप ग्रुप बनवून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जणू स्पर्धाच सुरू झालेली आहे. ग्रूपच्या माध्यमातून केलेली आणि न केलेली विकास (की स्वविकास) कामे जनतेसमोर आणण्याचे कार्य अहोरात्र सुरू आहे. मात्र इथेही त्या ग्रुपमध्ये कोणताही मतदार मेसेज करू शकणार नाही याची पुरती खबरदारी अनेकांनी घेतल्याचे दिसून येते. कोणताही मतदार जाहीरपणे गृपवर आपले मत व्यक्त करू शकणार नाही याची काळजी घेण्यात आली असल्याचे दिसून येते. ज्या मतदारांच्या जीवावर आमदारकीची बाजी मारायची आहे त्याच मतदार राजाचा आवाज आजही दाबला जातोय ही भावना मतदारांच्या मनात रुजली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सीना-भीमा नदी-उजनी धरणाचा पट्टा हा ऊसाचा भाग असल्याने येथील बऱ्यापैकी राजकारण साखर कारखानदारांभोवती फिरत राहते. माढा तालुक्यात विद्यमान आमदार ज्येष्ठ नेते बबनदादा शिंदे (MLA Baban Dada Shinde) यांचे वर्चस्व असले तरी साखर कारखानदारीत अल्पावधीत नवनवीन शिखरे पादाक्रांत करीत असलेल्या अभिजित पाटलांचे (Abhijeet Patil) आव्हान समोर आहे. ‘कारखाना चालवणारा माणूस’ आणि “शेतकऱ्यांना योग्य भाव देणारा कारखानदार” (‘Factory Man’ and “Factory Man Who Gives Fair Prices to Farmers“) अशी ओळख निर्माण झाल्याने पंढरपूर, सांगोला, माढा तालुक्यात अभिजित पाटलांची क्रेझ वाढत आहे. अशातच शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेणारा उमेदवार पाटलांसमोर तग धरू शकत नसल्याने माढा तालुक्यात प्रतिस्पर्थी असलेल्या इच्छुकांची धडधड वाढलेली दिसून येत आहे.

माढा विधानसभेच्या निवडणूक रिंगणात अनेक उमेदवार असणार असले तरी चर्चा मात्र अभिजित पाटील (Abhijeet Patil) यांचीच जास्त आहे. कोण कोणत्या पक्षातून उमेदवारी मिळवण्यास यशस्वी ठरतो याकडे मतदारांचे लक्ष आहे. यावेळी पक्षनिष्ठेपेक्षा (नेतेच रात्रीत निष्ठा गहाण ठेवतात तर मतदारांनी एकनिष्ठ का राहावे?) जातीय समीकरणे, शेतकऱ्यांचे हित जपणारा उमेदवार, तालुक्यात बोकाळलेला भ्रष्टाचार, अवैध धंदे, चक्री सारख्या ऑनलाईन गेममुळे उद्ध्वस्त होत असलेली तरुण पिढी आणि अवैध व्यवसायाला खतपाणी घालणारे राजकारणी, आरोग्य सुविधा आणि शैक्षणिक सुविधा या मुद्द्यांवर मतदान होणार असल्याचे दिसून येते.

माढा तालुक्यात यावेळी उत्तराधिकारीचा विषय जोरात आणि जोमात चर्चिला जात असला तरी लोकशाहीत उत्तराधिकारी नसतो तर जो जनतेला न्याय देऊ शकेल अशा उमेदवाराला जनता निवडून देत असते याची जाणीव आता मतदारांना झालेली आहे. त्यामुळे उत्तराधिकाऱ्याच्या चर्चेत सुज्ञ मतदार हिरीरीने भाग घेत आपले मत मांडत असल्याचे दिसून येत आहे. जागरूक होत असलेले मतदार हीच बळकट लोकशाहीची ओळख आहे.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button