माढा: ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या मार्गांनी नागरिकांची मोठया प्रमाणात फसवणूक होत असल्याचे आपण दररोज पाहतो. ऑनलाईन आर्थिक व्यवहाराची सुविधा देणाऱ्या अनेक कंपन्यांच्या ग्राहकांना पेमेंट रिक्वेस्ट पाठवून फसवले जाते, लॉटरी आणि इतर आमिष दाखवून ठराविक रक्कम मागितली जाते, मेसेज किंवा व्हॉट्सअप वर एखादी लिंक पाठवून फसवले जाते हे आपण नेहमी पाहत, ऐकत असतो.
परंतु शासकीय कार्यालयातून अशाप्रकारे फसवणूक झाल्याचे तुमच्या कधी लक्षात आले नसेल. कोणत्याही योजनांचा लाभ घेताना भ्रष्टाचार होऊ नये यासाठी केंद्र सरकारने DBT (Direct Benefit Transfer) प्रणाली सुरू केली. DBT मुळे मध्यस्थी व्यक्ती अगदी १० पैशाची अफरातफर करू शकत नाही हे खरे आहे. परंतु लाभार्थीच्या नावापुढे दुसऱ्याच व्यक्तीचा आधार नंबर जोडला गेला तर काय अनर्थ होतो याचा अनुभव माढा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना आलेला आहे.
नैसर्गिक आपत्ती पीक नुकसान भरपाई पोटी मिळणारी १३ हजार ६०० रुपये रक्कम शेतकऱ्याच्या परस्पर काढून घेतल्याची घटना माढा तालुक्यातील राहुलनगर येथे घडली होती. संबंधित व्यक्ती आणि आधार प्रमाणीकरण करणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्र चालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी पिडीत शेतकऱ्याने २९ जानेवारी रोजी माढा तहसीलदार यांचेकडे केली होती.
नुकसान झालेल्या शेतकऱ्याला दुसऱ्या व्यक्तींचा आधार नंबर लिंक करून नुकसान भरपाई रकमेचा परस्पर अपहार करण्याचा स्मार्ट उद्योग तलाठ्यांच्या संगनमताने होत असल्याची प्रकरणे माढा तालुक्यामध्ये उघड होत आहेत. शेतकऱ्यांनी तक्रार करूनही तहसील कार्यालयाकडून प्राप्त तक्रारींवर कोणत्याही प्रकारे कार्यवाही होताना दिसून येत नाही.
तहसिल कार्यालयातील ठराविक तलाठी, संबंधित कारकून खाजगी व्यक्तीला हाताशी धरून संघटीतपणे आणि संगनमताने शेतकऱ्यांच्या रकमेचा अपहार करीत असल्याची जनमानसात अनेक महिन्यांपासून चर्चा होत होती. राहुलनगर, महादपूर येथील घडलेले प्रकार पाहिल्यास होत असलेल्या चर्चेला बळ मिळते.
२९ जानेवारीपासून पाठपुरावा केल्यानंतर ज्या व्यक्तीने केवायसी करून रक्कम घेतली त्या व्यक्तीकडून अर्जदारावर दबाव आणला जात आहे मात्र संबंधित प्रकरणाची चौकशी केल्याची आणि दोषींवर कारवाई केल्याची माहिती विचारली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे पहावयास मिळते. सदरील प्रकरणांची आणि इतर प्राप्त तक्रारींची वरिष्ठ स्तरावरून चौकशी झाल्यास खूप मोठ्या प्रमाणात अपहाराची प्रकरणे समोर येतील असे जाणकारांचे म्हणणे आहे.